वडगाव शेरी : मोकळ्या जागा मद्यपींचे अड्डे | पुढारी

वडगाव शेरी : मोकळ्या जागा मद्यपींचे अड्डे

वडगाव शेरी; पुढारी वृत्तसेवा: कल्याणीनगर, वडगाव शेरी, विमाननगर, सोपाननगर, खराडी-चंदननगर आयटी पार्कचे मैदान आणि आपले घर सोसायटीच्या मोकळ्या जागा रात्री सातनंतर दारू पिण्याचे अड्डे बनू लागले आहेत. अंधार पडल्यानंतर मद्यपी चारचाकी आणि दुचाकी गाड्या लावून सर्रास दारू पित असल्याने या परिसरातून महिलांना जाणे अवघड झाले आहे. आयटी पार्कमधून सुटलेले कर्मचारी, विद्यार्थी, पीजीमध्ये राहणारे युवक आणि परप्रांतीय नागरिक पहाटे पाचपर्यंत एकत्र येऊन या ठिकाणी दारू पित बसतात.

स्थानिक नागरिकांनी हटकल्यानंतर त्यांच्यामध्ये वादावादी होते. बहुतांश वेळा मद्यपींकडून स्थानिक नागरिकांना मारहाण तसेच शिवीगाळ केल्याचे प्रकारही घडत आहेत. दारू पिल्यानंतर रस्त्यावर दारूच्या बाटल्या फोडणे, जोरजोरात ओरडणे तसेच एकमेकांसोबत मारहाण करण्याच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत.

परिसरात मद्यपींच्या वावरामुळे सायंकाळनंतर महिला, मुलींना मोकळ्या जागेच्या जवळील रस्त्यावरून जाता येत नाही. रात्री महिलांसाठी रस्ता बंद हा अलिखित नियम झाला आहे. तर, दुसरीकडे मद्यपींच्या त्रासामुळे नागरीक हैराण झाले आहे. या मद्यपींचा बंदोबस्त करावा. मद्यपींना आवरण्यासाठी या भागामध्ये गस्त सुरू करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी चंदननगर पोलिस ठाण्यामध्ये निवदेनाद्वारे केली .

ही ठिकाणे झाली आहेत मद्यपींचा अड्डा
सोपाननगर, गुलमोहर सेंटर, विमाननगर वेकफिल्ड आयटी पार्क, विमानतळ रस्त्यावरील मोकळ्या जागा, कल्याणीनगर बिशप शाळेच्या मागे, विमाननगर आयबीस हॉटेलच्या मागे, खराडी येथील वर्ल्ड टेंड सेंटर जवळील मोकळी जागा, झेन्सॉर आयटी पार्क मैदान, आपले घर सोसायटीकडे जाणारी मोकळी जागा, विमाननगर ई स्पेस आणि मंत्री कॉम्पलेक्स जवळीक सायकल ट्रॅक तसेच वडगावशेरी, कल्याणीनगर, विमाननगर, खराडी आणि चंदननगर या भागातील पदपथ तसेच मोकळ्या जागा.

 

Back to top button