पुणे : पेटीतल्या पोत्यात लपवले होते दागिने; 12 लाखांचे 18 तोळे दागिने जप्त | पुढारी

पुणे : पेटीतल्या पोत्यात लपवले होते दागिने; 12 लाखांचे 18 तोळे दागिने जप्त

पुणे; पुढारी वृत्तसेवा: शहरात घरफोडीचे गुन्हे घडत असताना हडपसर पोलिसांनी शिकलकरी टोळीच्या तीन सराईतांकडे केलेल्या तपासात त्यांच्या घरातून तब्बल 18 तोळ्यांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले. हे दागिने एकाने बेडखालील पेटीतील एका पोत्यात ठेवले होते. तर, दुसर्‍याने कपाटातील एका साडीत दागिने गुंडाळून ठेवले होते. पोलिसांनी खाक्या दाखवताच सराईतांनी हे दागिने काढून दिले. या वेळी सेन्ट्रो कारसह हडपसर पोलिसांनी 12 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला.

अक्षयसिंग जुनी (19), जितसिंग ऊर्फ जितूसिंग टाक (26) आणि लकीसिंग टाक (19, तिघेही रा. वैदूवाडी, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या तिघा सराईतांची नावे आहेत. तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक विजयकुमार शिंदे यांनी सांगितले, की हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी केल्यानंतर युनिट 5 ने जुनी याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला हडपसर पोलिसांच्या हवाली केले होते. त्याच्याकडील तपासात आणखी दोन नावे निष्पन्न झाल्यानंतर जितसिंग टाक याला ताब्यात घेतले, तर लकीसिंग याला उस्मानाबाद कारागृहातून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे केलेल्या तपासात चार घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले.

या वेळी त्यांच्याकडून 17 तोळे सोन्याचे दागिने आणि 800 ग्रॅम चांदीचे दागिने व सॅन्ट्रो कार जप्त करण्यात आली. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक अरविंद गोकुळे, गुन्हे निरीक्षक दिगंबर शिंदे, विश्वास डगळे, सहायक निरीक्षक विजयकुमार शिंदे, उपनिरीक्षक अविनाश शिदे, अंमलदार सुशील लोणकर, प्रशांत टोणपे, सचिन गोरखे यांच्या पथकाने केली.

Back to top button