पुणे : अब्दुल सत्तारांना शिक्षणमंत्री करा; राष्ट्रवादीची मागणी | पुढारी

पुणे : अब्दुल सत्तारांना शिक्षणमंत्री करा; राष्ट्रवादीची मागणी

पुणे; पुढारी वृत्तसेवा: टीईटी घोटाळ्याचे धागेदोरे माजी मंत्री अब्दुल सत्तारांपर्यंत पोहोचल्याने व त्यांच्या दोन्ही मुलींचे प्रमाणपत्र रद्द झाल्याचा धागा पकडत राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तार यांनाच शिक्षणमंत्री करा, अशी उपरोधिक मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष आमदार विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी डेंगळे पूल येथे टीईटी घोटाळ्याविरोधात आंदोलन करण्यात आले. या वेळी पक्षाचे प्रवक्ते प्रदीप देशमुख, वैशाली नागवडे, मृणालिनी वाणी, विद्या ताकवले, दिलशाद अत्तार, लोचन शिवले व महिला पदाधिकारी उपस्थित होते. ‘ईडीच्या भीतीपोटी अनेक आमदार भाजपमध्ये सामील होत आहेत.

त्यामुळे हे सरकार गद्दाराचे आहे आणि गद्दारांकडून आणखी काय अपेक्षा असते, ते आपल्याच घराचा उद्धार करणार,’ अशी टीका आमदार चव्हाण यांनी केली ‘आमदार अब्दुल सत्तारांना भ्रष्टाचारी म्हणू नका. कारण ते भाजपच्या वॉशिंग मशिनमध्ये धुवून निघालेले आहेत आणि ते अत्यंत कुटुंबवत्सल आहेत. त्याप्रेमापोटी त्यांच्या मुली अपात्र असतानाही पात्र झाल्या आणि आपल्याच संस्थेवर त्यांनी त्यांना नोकरीही दिलेली आहे, असे महान शिक्षणतज्ज्ञ जर या राज्याला शिक्षण मंत्री म्हणून लाभले, तर सरकारच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाईल,’असे मत प्रदीप देशमुख यांनी व्यक्त केले.

Back to top button