पुणे : नव्या सरकारचे निर्णय इंदापूरला बाधक | पुढारी

पुणे : नव्या सरकारचे निर्णय इंदापूरला बाधक

वालचंदनगर, पुढारी वृत्तसेवा : राज्यात शिंदे गट व भाजप सरकार अस्तित्वात आल्याबरोबर त्यांनी राज्यातील अनेक महत्त्वाकांक्षी विकासकामांना स्थगिती दिली. इंदापूर तालुक्यातील जलसंधारणाची कामेही यामुळे स्थगित झाली आहेत. परिणामी, तालुक्यातील 35 गावांमध्ये सुरू होणारी जलसंधारणाची कामे रखडली असून, तालुक्यातील 595 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्यापासून दुरावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे मृद व जलसंधारण खात्याचे राज्यमंत्री होते. भरणे यांनी तालुक्यातील शेतीसिंचनाची गरज ओळखून ओढ्या-नाल्यांवर सिमेंट नाला बांध घालणे, पाझर तलाव दुरुस्त करणे व नव्याने चार ठिकाणी साठवण तलाव उभारण्यासाठी तब्बल 48 कोटींचा निधी मंजूर करून आणला होता. या कामांची निविदाप्रक्रिया पूर्ण झाली होती. काही दिवसांत कामांना कार्यारंभ आदेश दिला जाणार तेवढ्यात राज्यात सत्ताबदल झाला आणि नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने सर्वप्रथम जलसंधारण खात्याच्या कामांना स्थगिती दिल्याने इंदापूर तालुक्यातील 35 गावांमध्ये होणारी जलसंधारणाची कामे अधांतरी राहिली आहेत. या कामामुळे तालुक्यातील तब्बल 595 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार होते.

वास्तविक, या 35 गावांपैकी अनेक गावे भाजप विचाराची आहेत. असे असतानाही भाजप सरकारने दिलेल्या स्थगितीमुळे तालुक्यातील सर्वसमावेशक शेतकर्‍यांवर अन्याय झाल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहे. राज्य सरकारने ग्रामीण भागातील शेतकर्‍यांच्या प्रपंचाशी निगडित असलेल्या विकासकामांमध्ये राजकारण न आणता जनतेच्या हिताच्या कामांना तातडीने पुनश्च परवानगी देण्याची मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.

स्थगिती मिळालेल्या कामांमध्ये समाविष्ट गावे : कचरेवाडी, मदनवाडी, गोखळी, कौठळी, निमगाव केतकी, कालठन नं. 1, रेडा, काटी, पिंपळे, खोरोची, रेडणी, निमसाखर, रणगाव, गोतोंडी, निंबोडी, तरंगवाडी, बोरी, कळस, पिटकेर्श्वर, काझड, चाकाटी, शिरसटवाडी, गलांडवाडी, बोराटवाडी, बावडा, कळंब, भांडगाव, दगडवाडी, सराफवाडी, कडबनवाडी, न्हावी, व्याहळी, काळेवाडी, भावडी व शेटफळ गढे या गावांतील 65 बंधारे, 1 पाझर तलाव व 4 साठवण तलावांची कामे स्थगित झाली आहेत.

Back to top button