

वालचंदनगर : पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्यातील निरवांगी ते मानेवस्ती या रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून रखडले होते. सध्या या कामास मुहूर्त मिळाला असून, युद्धपातळीवर काम सुरू झाले आहे. गेल्या दोन वर्षांपासून संत सोपानकाका पालखी मार्गाचे काम सुरू आहे. इंदापूर तालुक्यातून तावशी ते बावडा या जवळपास 40 किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम सुरू आहे. सुरुवातीला या रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू होते, त्यामुळे या रस्त्यावरील वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला होता.
प्रवाशांना लांबच्या पल्ल्याने प्रवास करावा लागत होता. गेल्या काही महिन्यांपूर्वी जवळपास 70 टक्के रस्त्याचे काम पूर्ण झाले आणि तेव्हापासून निमसाखर परिसरातील काही टप्पा व निरवांगी ते मानेवस्ती हा टप्पा रखडला होता. या भागातील नागरिकांनी वारंवार पाठपुरावा केल्याने अखेरीस या रस्त्याचे काम पुन्हा सुरू झाले आहे. सध्या निरवांगी ते मानेवस्ती या रस्त्याचे मुरमीकरण करून त्यावर खडीचा पहिला थर देण्याचे काम सुरू आहे. निरवांगी येथील ओढ्यावरील पुलाचे कामही अंतिम टप्प्यात आहे. निमसाखर परिसरात रस्त्याच्या बाजूचे गटारीचे काम अंतिम टप्प्यात असून, त्यापाठोपाठ रस्ता करण्याचे काम सुरू आहे. लवकरच या रस्त्याचे काम पूर्ण होण्याची नागरिकांना अपेक्षा असून, या मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.