शिवापुरात गणपती मूर्ती बनविण्याची लगबग | पुढारी

शिवापुरात गणपती मूर्ती बनविण्याची लगबग

खेड-शिवापूर : पुढारी वृत्तसेवा : काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुंभार समाजबांधवांची श्रीगणेशाच्या विविध आकाराच्या रेखीव व सुबक मूर्ती तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे. शहरासह इतर भागांतून बाप्पाच्या मूर्ती आरक्षित करून ठेवण्यासाठी नागरिकांची ये-जा वाढल्याने गावाला जत्रेचे स्वरूप आले आहे.

शिवापूर (ता. हवेली) भागात तसेच पुणे शहरातील नागरिक शेकडो गणपती मूर्तींची होलसेल भावात खरेदी करून पुणे शहरात विक्री करतात. त्यामुळे गणपती उत्सव सुरू होण्याच्या किमान एक महिना अगोदर मूर्तींची खरेदी-विक्री सुरू होते. किमान 200 ते. 1500 रुपयांपर्यंत मूर्तींची किंमत असते. प्रत्येक हंगामात साधारण लाख ते सव्वा लाख रुपये फायदा होत असल्याचे व्यावसायिक सोमनाथ दत्तात्रय कुंभार यांनी सांगितले.

आम्ही गेल्या नऊ ते दहा वर्षांपासून गणपती मूर्ती बनविण्यापासून ते विक्री हा व्यवसाय करीत आहोत. बाजारात नवनवीन मूर्तींची क्रेझ येत असल्याने या वेळी बैलगाडीमधून निघालेली मूर्ती ग्राहकांचे आकर्षण ठरली आहे. आत्तापर्यंत सुमारे दोन हजार मूर्ती विकल्या गेल्या आहेत, तर साधारण हजारेक मूर्ती शिल्लक आहेत.
                                    – सोमनाथ कुंभार, मूर्ती व्यावसायिक, शिवापूर

मी गेल्या आठ वर्षांपासून शिवापूर येथून बाप्पाच्या मूर्ती विक्रीसाठी आणत आहे. पहिल्या वर्षी फक्त 50/60 मूर्ती आणून विक्री केली. मात्र, त्या वेळी बाजारभावाचे ज्ञान नव्हते. या वर्षी साधारण दोनशे मूर्ती खरेदी केल्या आहेत. हंगामात साठ हजार रुपये नफा होतो.
                           – ज्ञानेश्वर निंबाळकर, व्यावसायिक, निंबाळकरवाडी, पुणे

Back to top button