सविंदणे येथे ड्रोनद्वारे फवारणी | पुढारी

सविंदणे येथे ड्रोनद्वारे फवारणी

टाकळी हाजी : पुढारी वृत्तसेवा : शिरूर तालुक्यातील सविंदणे येथील प्रगतशील शेतकरी व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ नवी दिल्लीचे सदस्य बाळासाहेब पडवळ यांनी आपल्या शेतात अभिनव प्रयोग करीत शेतातील झेंडू व ऊसपिकाला ड्रोनद्वारे फवारणी केली.
पडवळ हे आपल्या शेतात कायमच नवनवीन प्रयोग यशस्वी करतात. पंपाद्वारे फवारणी करताना कीटकनाशके अंगावर उडतात. त्याचा परिणाम शेतकर्‍यांच्या आरोग्यावर होतो. आरोग्यासाठी सुरक्षित व वेळेची बचत म्हणून ड्रोनद्वारे फवारणी करणे महत्त्वाचे आहे.

ड्रोन फवारणीसाठी साधारणपणे एकरी आठशे रुपये खर्च येतो. पंधरा मिनिटांत एक एकर फवारणी केली जाते. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट कृषी विभाग मांजरी येथील अधिकारी तसेच भीमाशंकर कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी दिलीप कुरकुटे व त्यांचे कार्यालयीन सहकारी यांनी शेतकर्‍यांना ड्रोनद्वारे फवारणी करण्याकामी प्रोत्साहित केले.

ड्रोनद्वारे फवारणी केल्यास वेळेची, पैशाची बचत होते. ऊसवाढ झाल्यास ऊसपिकांना अँसोटोबॅक्टर फवारणी करणे आवश्यक असते. परंतु, ऊस वाढल्याने पंपाने फवारणी करता येत नाही. जमिनीतून ऊसपिकाला योग्य मूलद्रव्ये मिळत नाहीत. ड्रोनद्वारे फवारणी केल्यास उसाच्या पानांमधून मूलद्रवे चांगल्या प्रकारे मिळाल्याने उसाची वाढ जोमाने होण्यास मदत होते.
– प्रदीप वळसे पाटील, संचालक, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना

Back to top button