पुणे : महाळुंगे पडवळला हुतात्म्यांच्या स्मृतींचे जतन | पुढारी

पुणे : महाळुंगे पडवळला हुतात्म्यांच्या स्मृतींचे जतन

महाळुंगे पडवळ, पुढारी वृत्तसेवा : हुतात्मा बाबू गेनू प्रतिष्ठानच्या वतीने स्वातंत्र्य आंदोलनातील घटनांच्या स्मृती जपण्यासाठी सुमारे 3 लाख 40 हजार रुपये खर्च करून शिल्पांची दुरुस्ती केली आहे. नऊ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते अनावरण होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष किसनराव सैद यांनी दिली.

स्वदेशी आंदोलनात अग्रस्थानी राहून आत्मबलिदान करणार्‍या हुतात्मा बाबू गेनू सैद यांच्या जन्मगावी व रस्त्यालगत चौथरे बांधून स्वातंत्र्यपूर्व काळातील आंदोलनाचे प्रसंग शिल्परूपाने बांधले होते. बाबू गेनू यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सार्वजनिक बांधकाम विभाग घोडेगाव यांच्यामार्फत बांधले होते. मागील काही वर्षांत या बांधकाम केलेल्या शिल्पाच्या चौथर्‍यांची दुरवस्था झाली होती.

हुतात्मा बाबू गेनू प्रतिष्ठानचे संस्थापक व बाबू गेनू यांचे वारस पुतणे किसनराव सैद यांच्या पुढाकाराने व प्रतिष्ठानचे डॉ. रंगनाथ चासकर, मकबूल इनामदार, हनुमंत पर्वत, किशोर भालेराव यांच्या मदतीने सुमारे 3 लाख 40 हजार रुपये खर्चून नव्याने या शिल्पांचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. कळंब महाळुंगे रस्त्याच्या दुतर्फा सुमारे सहा ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात ही शिल्पे दिसत आहेत.

हुतात्मा स्मारकाला भेट देणार्‍या असंख्य हुतात्माप्रेमींना ये-जा करताना ही शिल्पे आकर्षित करीत आहेत. गावच्या वैभवात भर पडल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. पुणे-नाशिक रस्त्यावर कळंब येथे फाट्यावर बांधलेल्या कमानीचे रंगकाम सार्वजनिक बांधकाम विभाग उत्तर घोडेगाव यांच्यामार्फत केले आहे.

Back to top button