पुणे : देवगाव येथील बंधारा वाहतुकीसाठी धोकादायक

मंचर, पुढारी वृत्तसेवा : देवगाव (ता. आंबेगाव) येथील बंधार्याचे संरक्षक कठडे तुटले आहेत. यामुळे वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. यामुळे या बंधार्याला नवीन संरक्षक कठडे बसवावेत, अशी मागणी शेतकर्यांनी जलसंपदा विभागाकडे केली आहे.
देवगाव येथील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधार्यावरील रस्ता पिंपरखेड व देवगाव या दोन गावांना जोडतो. यामुळे या मार्गावर लोकांची वर्दळ असते. देवगावला पिंपरखेड येथून शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येत असतात. परंतु, या बंधार्याला दोन्ही बाजूने असणारे संरक्षक कठडे तुटल्याने ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
याबाबत जलसंपदा विभागाला वारंवार कळविले आहे. परंतु, त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. या बंधार्यावर तातडीने संरक्षक कठडे बसवावेत, अशी मागणी संजीवनी ग्रुप व ग्रामस्थांनी केली आहे.