पुणे : पन्नास रुपये मिळाल्याने चोरांनी घेतले चक्क गल्ल्याचे दर्शन | पुढारी

पुणे : पन्नास रुपये मिळाल्याने चोरांनी घेतले चक्क गल्ल्याचे दर्शन

आळेफाटा, पुढारी वृत्तसेवा : आळेफाटा (ता. जुन्नर) येथे शुक्रवारी (दि. 5) मध्यरात्री चोरट्यांनी पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दोन दुकानांसह दोन पतसंस्थांना लक्ष्य केले. परंतु म्हणावी अशी रक्कम न मिळाल्याने त्यांनी चक्क एका दुकानाच्या गल्ल्याचे दर्शन घेतले. सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार कैद झाला असून, आळेफाटा परिसरात चर्चेचा विषय बनला.

आळेफाटा पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेले एक मेडिकल, बियरशॉपी यासह दोन पतसंस्था अज्ञात चोरट्यांनी फोडल्याचा प्रकार शनिवारी (दि.6) सकाळी समोर आला. आळेफाटा पोलिसांना समजताच पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर आदी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अधिक तपास केला असता, चोरट्यांनी विशेष चोरी केली नसल्याचे उघडकीस आले. मात्र, दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, तीन अज्ञात चोरटे सीसीटीव्हीमध्ये दिसून आले.

चोरी करत असताना म्हणावी अशी रक्कम न मिळाल्याने चोरट्यांनी चक्क एका दुकानाच्या गल्ल्याचे दर्शनही घेतल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये दिसून आला. गल्ल्याचे दर्शन घेतल्यानंतर जे हाती लागले ते घेऊन चोरांनी पोबारा केला. विशेष चोरी झाली नसल्याने शनिवारी संध्याकाळपर्यंत आळेफाटा पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, शनिवारी दिवसभर आळेफाटा परिसरात चोरीचा प्रकार चर्चेचा विषय बनला.

Back to top button