सलग तीन तास झालेल्या मुसळधार पावसाने बांदलवाडीतील शेती, रस्ते गेले वाहून | पुढारी

सलग तीन तास झालेल्या मुसळधार पावसाने बांदलवाडीतील शेती, रस्ते गेले वाहून

परिंचे; पुढारी वृत्तसेवा: ढगफुटीसदृश झालेल्या पावसाने काळदरी (ता. पुरंदर) परिसरातील बांदलवाडी, रामवाडी, कोंडकेवाडी परिसरातील शेतीचे, तसेच रस्त्यांचे मोठे नुकसान झाले. गुरुवारी (दि. 4) रात्री सलग तीन तास जोरदार पाऊस पडत होता. यामुळे या भागातील भातशेतीचे होत्याचे नव्हते झाले, अशी प्रतिक्रिया या भागातील शेतकर्‍यांनी व्यक्त केली. तहसीलदारांनी नुकसानीची पाहणी केली आहे. तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी सरपंच गणेश जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, शिवसेनेचे हरिभाऊ लोळे यांनी केली आहे.

बांदलवाडी परिसरात नुकत्याच भात लावणी झाल्या आहेत. पंचाहत्तर टक्के क्षेत्रावरील लागणी पूर्ण झाल्या असून, उर्वरित भात लावणीची कामे वेगात सुरू होती. त्यातच गुरुवारी तीन तास या परिसरात मुसळधार पाऊस कोसळला. डोंगरावरून पावसाचे पाणी शेत जमिनीत घुसल्याने बांध, दगडी ताली फुटून भात शेतीचे नुकसान झाले. काही ठिकाणी शेतजमिनी वाहून गेल्या. भाताची रोपे गाडली गेली, असे शेतकरी स्वागत कोंढाळकर, शिवाजी पेटकर, बाळासाहेब बांदल, अनिल जाधव, संपत जाधव आदींनी सांगितले.

या परिसरात नव्याने करण्यात आलेले रस्ते जोरदार पावसाने वाहून गेले. काही ठिकाणी रस्ते खचले आहेत. मंडल कृषी अधिकारी संजय फडतरे, बांधकाम विभागाचे शाखा अभियंता रोहिदास साबळे, तलाठी बजरंग सोनवले, कृषी परिवेक्षक संदीप कदम, ग्रामसेवक संजय पारधी यांच्या पथकाने नुकसानीची पाहणी केली.

Back to top button