हडपसर : पालिकेच्या ‘घरटं प्रकल्पातील ‘चिमण्यां’ची हेळसांड; वसतिगृहातील 11 मुलींना त्वचेचे आजार

‘घरटं’ प्रकल्पातील मुलींची विचारपूस करताना अधिकारी.
‘घरटं’ प्रकल्पातील मुलींची विचारपूस करताना अधिकारी.
Published on
Updated on

हडपसर; पुढारी वृत्तसेवा: पुणे महापालिकेकडून राबवण्यात येत असलेल्या 'घरटं' प्रकल्पातील हडपसर येथील मुलींच्या वसतिगृहातील 20 पैकी 11 मुलींना त्वचेच्या विकारांनी ग्रासल्याचे दिसून आले आहे. 'बचपन बचाव समिती' या स्वयंसेवी संस्थेमार्फत हे वसतिगृह चालवण्यात येत असून, संस्था मुलींच्या आरोग्याची हेळसांड करीत आहे, असा आरोप पालकांकडून करण्यात येत आहे. रस्त्यावर राहत असलेल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, त्यांच्यात शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, यासाठी पुणे महापालिकेकडून सन 2007-2008 पासून 'घरटं' हा प्रकल्प राबवला जात आहे.

समाज विकास विभाग आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने पुण्यामध्ये एकूण तीन प्रकल्प राबवण्यात येतात. त्यासाठीचा 100 टक्के निधी महापालिकेकडून पुरवला जातो. त्यापैकी एक प्रकल्प हा हडपसरमधील मनपा शाळा क्र. 100 बंटर स्कूल, हडपसर गाडीतळ येथे सुरू आहे. या प्रकल्पात एकूण 43 मुली शिक्षण घेतात. त्यापैकी 20 मुली निवासी हजर असतात. यामधील 11 मुलींना चेहर्‍यावर, मानेवर, हाता-पायांवर पुरळ येऊन त्यांना त्वचेच्या समस्येला सामोरे जावे लागले आहे.

पालिकेकडून लाखो रुपये उपलब्ध करून दिले असतानाही मुलींच्या आरोग्य तपासणीकडे संस्थेने दुर्लक्ष केले असल्याचे पालकांनी सांगितले. याबाबत पालकांनी तक्रार केली होती. मात्र, संबंधित त्वचेचे आजार झालेले असतानाही मुलीला घरी पाठवून देण्यात आले. तसेच, तुम्हीच उपचार करा, असे बचपन बचाव समिती संस्थेचे प्रतिनिधी रोहिणी नलावडे यांनी सांगितल्याचे पालकांनी सांगितलेे.
बचपन बचाव समितीला गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेने घरटं प्रकल्प चालविण्यास दिला आहे. या प्रकल्पात कामगार व मोलमजुरी करणार्‍यांच्या मुली शिक्षण घेण्यासह राहायला आहेत.

या मुलींना नाष्टा, दोन वेळेचे जेवण व आंघोळीला गरम पाणी, अंगाचे साबण पुरवण्याचे काम पालिकेने बचपन समितीला दिले आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने मुलींना सध्या संसर्गजन्य आजारांना सामोरे जावे लागत आहे. या ठिकाणी अनेक राजकीय पुढारी आपल्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्धीसाठी कार्यक्रम घेऊन देखावा करतात. गेली अनेक दिवस त्वचेने ग्रासले असल्याचे समजूनही या मुलींना उपचारांसाठी झगडत राहण्याची वेळ आली आहे. त्यांना तातडीने उपचार मिळावेत, अशी मागणी पालकांनी केली आहे.

दर तीन महिन्यांनी पालिकेकडून आरोग्य तपासणी केली जाते. यावर डॉक्टर तपासून उपचार करत असतात.
                  – रवींद्र वाघ, संचालक, बचपन बचाव समिती, गाडीतळ, हडपसर

पावसामुळे ओल्या कपड्याने संसर्ग झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. मुलींना आवश्यक त्या सर्व गोष्टी संस्थेने पुरविणे आवश्यक होते. सध्या संस्थेतील अकरा मुलींना त्वचेचे आजार झाले असून, त्यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

                                – डॉ. स्नेहल काळे, वैद्यकीय अधिकारी, पुणे मनपा, हडपसर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news