खडकवासला : दाट धुके, थंडगार वार्‍यात दुर्गम राजगड, तोरणा तरुणाईने फुलला; | पुढारी

खडकवासला : दाट धुके, थंडगार वार्‍यात दुर्गम राजगड, तोरणा तरुणाईने फुलला;

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा: दाट धुके, पाऊस आणि जोरदार वाहणार्‍या थंडगार वार्‍यात विलोभनीय निसर्गसौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी रविवारी (दि. 7) सुटीच्या दिवशी दुर्गम राजगड, तोरणा गडावर शेकडो पर्यटकांनी गर्दी केली होती. तरुणाईने गडाच्या पाऊलवाटा, प्रवेशद्वार, तटबंदी बुरुज अक्षरश: फुलून गेले होते. गडाच्या पायथ्याच्या परिसरात तुरळक पाऊस असला तरी गडाच्या माथ्यावर थंडगार वारे वाहत होते. दाट धुके आणि अधुनमधून सरी कोसळत होत्या. दुपारी दोन नंतर अधुनमधून जोरदार सरी कोसळल्या. पाऊस, वार्‍याची पर्वा न करता हर हर महादेव, जय शिवरायच्या जयघोषात महिला, तरुण, मुले कडेकपार्‍यातील अरुंद पाऊल वाटा, निसरड्या खडकातुन गडावर चढाई करत होते.

पद्मावती माचीवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजसदरेसह गडाचा परिसर शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. राजगडावर रविवारी उंच्चाकी पर्यटक आले होते. सकाळपासून गुंजवणे, पाल खुर्द तसेच इतर मार्गाने पर्यटकांची वर्दळ सुरू होती. राजगडाचा दुर्गम बालेकिल्ला पर्यटकांनी गजबजून गेला होता. बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली. त्यामुळे खडकातील अरुंद मार्गाने चढाई करताना तसेच उतारताना पर्यटकांना मोठी कसरत करावी लागली.

राजगडाचे पाहरेकरी बापू साबळे, सुरक्षारक्षक आकाश कचरे, विशाल पिलावरे, दीपक पिलावरे हे पर्यटकांना सूचना करत होते. दिवसभरात राजगडावर दोन हजारांहून अधिक पर्यटकांनी हजेरी लावली. अतिदुर्गम म्हणून ओळख असलेल्या तोरणागडावरही आज शेकडो पर्यटकांनी गर्दी केली होती. वेल्हे तसेच मेटपिलावरे मार्गाच्या डोंगर-कपारीतील दुर्गम पाऊलवाटांनी चढाई करत सकाळपासून पर्यटकांची वर्दळ सुरू होती. सकाळपासून तुरळक पाऊस होता, दुपारी तीननंतर जोरदार सरी कोसळल्या. दाट धुक्यात गडाचा परिसर हरवून गेला आहे. तोरणागडाचे पाहरेकरी दादू वेगरे यांच्यासह सुरक्षारक्षक गडावर तैनात होते. पानशेत, वरसगाव, गुंजवणे धरण, केळद, मढेघाट परिसरात पर्यटकांनी गर्दी केली होती.

 

Back to top button