पिंपरी: वास्तुशास्त्र तज्ज्ञाची स्वतःच्या कार्यालयात आत्महत्या | पुढारी

पिंपरी: वास्तुशास्त्र तज्ज्ञाची स्वतःच्या कार्यालयात आत्महत्या

पिंपरी: पुढारी वृत्तसेवा : जागेच्या कारणावरून विविध आरोप करीत त्रास देणार्‍या शेजार्‍यांच्या त्रासाला कंटाळून नवी सांगवी येथील एका वास्तुशास्त्र तज्ज्ञाने स्वतःच्या कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या तीन पानांच्या चिठ्ठीत संपूर्ण प्रकार नमूद केला आहे. पोलिसांनी चिठ्ठी जप्त केली आहे. ही घटना दि. (2 जुलै) रोजी घडली असून याप्रकरणी तपास करून शनिवारी (6 रोजी) रोजी गुन्हा दाखल करत चारही आरोपींना अटक केली आहे.

अशोक मच्छिंद्र जानराव (वय 61, रा. सांगवी), कुणाल अशोक जानराव (वय 34) आणि दोन महिला यांना अटक केली आहे. मारूती गणपतराव तरटे (वय 50, रा. नवी सांगवी) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार सचिन धर्माजी ढवळे यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक एस. बी. कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 जुलै रोजी सकाळी सांगवी पोलिसांना माहिती मिळाली की, नवी सांगवी येथील एका कार्यालयात एका इसमाने आत्महत्या केली आहे. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मारुती तरटे हे पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत होते.

पोलिस तपासात तीन पानांची चिठ्ठी पोलिसांना मिळाली असून, मारुती तरटे हे प्रसिद्ध वास्तुशास्त्र तज्ज्ञ होते. त्यांचे नवी सांगवी येथे कार्यालय आहे. आरोपी हे तरटे यांच्या शेजारी राहण्यास आहेत. मागील 15 वर्षांपासून आरोपी हे फिर्यादीस जागेवरून त्रास देत आहेत. प्लॉट किंवा पैसे दे अन्यथा तुझ्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू, अशी आरोपी वारंवार तरटे यांना धमकी देत होते. दरम्यान तरटे यांनी आरोपींना काही रक्कम दिली आहे.

तरीही त्रास न थांबल्याने त्यांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. माझे आयुष्य जानराव कुटुंबियांमुळे संपवत असल्याचे तरटे यांनी चिठ्ठीत स्पष्ट म्हटले आहे. घटना घडल्यानंतर तरटे यांच्या कुटुंबियांनी याप्रकरणी तक्रार देण्यास नकार दिला. तक्रार दिल्याने आमचा माणूस परत येणार आहे का, असे म्हणणे तरटे यांच्या नातेवाईकांचे आहे. सुरुवातीला अकस्मात मयत अशी नोंद करण्यात आली. त्यानंतर चौकशी करून पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आणि आरोपींना अटक केली आहे. सांगवी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Back to top button