पिंपरी : अंमली पदार्थाची विक्री करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश साडेअठरा लाखांचा मुद्देमाल जप्त | पुढारी

पिंपरी : अंमली पदार्थाची विक्री करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश साडेअठरा लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पॉपी स्ट्रॉची (अफूच्या बोंडाचा चुरा) शहरात विक्री करणार्‍या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. आरोपींकडून 110 किलो पॉपी स्ट्रॉ, अफिम, पिस्तूल, काडतुसे, असा 18 लाख 59 हजार 495 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमली पदार्थविरोधी पथकातील पोलिस अंमलदार प्रदीप शेलार आणि संदीप पाटील यांना माहिती मिळाली की, सांगवंडे गाव येथे एकजण पॉपी स्ट्रॉ या अंमली पदार्थांची विक्री करीत आहे.

त्यानुसार, पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. त्यावेळी आरोपी जयप्रकाश साईराम खीचड (24, रा. सांगवडे, ता. मावळ), महेश कुमार उर्फ श्याम बाखाराम बिष्णोई, विकास मोहनराम बिष्णोई या तिघांकडून 110 किलो पॉपी स्ट्रॉ, 56 ग्रॅम अफिम, एक देशी बनावटीचे पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे, असा 18 लाख 59 हजार 495 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिस तपासात हा माल पप्पू उर्फ भगवानराम खमुराम बिष्णोई, सुरेशकुमार जगलागाराम सियाक बिष्णोई, (दोघे रा. सांगवडे, ता. मावळ. मूळ रा. राज्यस्थान) यांचा असून तो त्यांना सुरेशकुमार याचा भाऊ महिपाल जंगलानाराम सियाक बिष्णोई याने हा राज्यस्थान येथून घेऊन दिल्याचे समोर आले.

तसेच, हा माल आरोपी विकास डाका बिष्णोई याच्या मदतीने पिंपरी चिंचवड शहरात विक्रीसाठी आणल्याची कबुली आरोपींनी दिली. ही कामगिरी सहाय्यक पोलिस आयुक्त पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश पवार, सहाय्यक निरीक्षक प्रशांत महाले, उपनिरीक्षक राजन महाडीक यांच्या पथकाने केली.

Back to top button