औरंगाबाद कनेक्शन पुन्हा चव्हाट्यावर; इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसच्या छुप्या वापरासाठी वेगवेगळी शक्कल | पुढारी

औरंगाबाद कनेक्शन पुन्हा चव्हाट्यावर; इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसच्या छुप्या वापरासाठी वेगवेगळी शक्कल

महेंद्र कांबळे

पुणे : परीक्षेत इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसचा वापर करून कॉपी करणे किंवा परीक्षेपूर्वीच पेपर फोडणे अशा हेराफेरी प्रकरणातील औरंगाबाद कनेक्शन केवलसिंग (30, रा. होनोबाची वाडी, गेवराई, पैठण, औरंगाबाद) याच्या माध्यमातून पुन्हा चव्हाट्यावर आले आहे. प्रकरण उघड करताना पोलिसांनी आरोपीचे हे प्रयत्न हाणून पाडले आहेत. यापूर्वी पोलिस भरती तसेच अन्य परीक्षेतदेखील अशाच पद्धतीने हेराफेरी करण्याचे प्रकार पोलिसांनी उघड केले होते. तेथेही औरंगाबादच्या परीक्षार्थींचा सहभाग आढळून आला होता.

म्हाडा, आरोग्य भरती, टीईटीतही औरंगाबादचे एजंट
म्हाडा, आरोग्य तसेच टीईटीतील गैरव्यवहारात राज्यातील सर्वांत मोठे औरंगाबादचे कनेक्शन पुणे सायबर पोलिसांनी उघड केले होते. या तिन्ही प्रकरणात औरंगाबाद येथील बरेच एजंट आणि करिअर अ‍ॅकॅडमीच्या मालकांना तसेच संचालकाना पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या.

एसआरपीएफ परीक्षेवेळी औरंगाबादचेच दोघे
राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) लेखी परीक्षेत भावाच्या जागेवर पेपर देण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वी समोर आला होता. ब्ल्यू टुथद्वारे कॉपी करताना पोलिसांनी जोडवाडी, औरंगाबाद येथील एकाला अटक केली होती. त्याच्यावर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच दिवशी एसआरपीएफची शहरात लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत कोथरूड येथे मोबाईलद्वारे प्रश्नपत्रिकेची कॉपी करणार्‍यास एका उमेदवाराला पोलिसांनी अटक केली होती. यावेळी औरंगाबादमधील खुलताबाद -मुंबापूरवाडी येथील एकाला अटक करण्यात आली होती.

लोहमार्ग पोलिसांच्या परीक्षेतही तोच अनुभव
ऑक्टोबर 2021 मध्ये लोहमार्ग पोलिसांच्या लेखी परीक्षेत इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटद्वारे कॉपी करणार्‍या औरंगाबाद- वैजापूर येथील उमेदवाराला स्वारगेट पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. त्यावेळी गुलटेकडी येथील कटारिया हायस्कूलमध्ये गुणसिंगे याचा नंबर लागला होता. परीक्षा सुरू झाल्यावर त्याने इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईस काढले. याद्वारे मित्राला प्रश्न सांगून त्याच्याकडून उत्तर माहिती करून घेत असताना त्याला रंगेहात पकडण्यात आले होते.

Back to top button