पावसाने उसंत दिल्याने पेरण्यांची लगबग, मोशीत सोयाबीनला प्राधान्य | पुढारी

पावसाने उसंत दिल्याने पेरण्यांची लगबग, मोशीत सोयाबीनला प्राधान्य

मोशी : पुढारी वृत्तसेवा : गेल्या महिनाभर झालेल्या मुसळधार पावसाचा फायदा शेती कामाला झाला असून मोशी, डुडुळगाव, चिखली परिसरात पेरण्यांची लगबग सुरू झाली आहे. सध्या वरुणराजाची बरसात मुसळधार नसली तरी रिमझिम सुरू असून त्याचा फायदा पीक वाढीला होत आहे. या भागात जादातर शेतकरी सोयाबीन पिकाला प्राधान्य देत आहेत.कमी पाण्यात चांगले उत्पन्न देणारे पीक असल्यामुळे अनेक शेतकरी हे पीक घेताना दिसून येतात. या शिवाय मशागत आणि खुरपणीदेखील कमी असल्याने मेहनतीचा विचार करता शेतकरी या पिकाची जादातर लागवड करताना दिसून येतात.

मोशी भागात सध्या मोठ्या प्रमाणात रहदारी वाढत आहे. शेती क्षेत्र झपाट्याने कमी होत आहे. तरी ही काही शेतकरी असूनही शेती जोपासताना दिसून येतात. पाऊस लांबल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली होती. मात्र, जूनच्या शेवटच्या आठवड्यात जोरदार पाउस बरसल्याने ती देखील चिंता मिटली आहे. आता पेरण्या उरकून शेतकरी बियांना अंकुर फुटण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

पाऊस समाधानकारक झाल्याने यंदाचा हंगाम तरणार असल्याचे दिसून येत आहे. इंद्रायणीतील जलपर्णीदेखील वाहून गेल्याने शेतीला फेस नसलेले पाणी देता येणार आहे. त्यामुळे शेतकरी आनंदीत दिसत आहेत.

मजुरांची टंचाई
शेतीला समाधानकारक पाऊस झाला असला तर मजुरी टंचाई मात्र कायम जाणवत आहे. शेतकर्‍यांवर शेतीवर काम करणारे मजूर शोधण्याची वेळ आली आहे.

Back to top button