‘माळेगाव’ची पहिली उचल प्रतिटन 2851 रुपये

‘माळेगाव’ची पहिली उचल प्रतिटन 2851 रुपये

शिवनगर; पुढारी वृत्तसेवा : माळेगाव सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम सन 2022- 23 मध्ये तुटून येणार्‍या उसाला प्रतिटन 2 हजार 851 रुपये देण्याचे निश्चित केले आहे. सोमवार (दि. 5) संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी पहिली उचल देण्याचे धोरण जाहीर केले. या वेळी उपाध्यक्ष सागर जाधव, सर्व संचालक तसेच कार्यकारी संचालक राजेंद्र जगताप आदी उपस्थित होते. दरम्यान माळेगाव साखर कारखान्याची पहिली उचल शेजारील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या तुलनेने प्रतिटन 51 रुपये जादा असल्याचे दिसते.

माळेगाव सहकारी साखर कारखाना राज्यात अग्रगण्य सहकारी कारखाना म्हणून ओळखला जातो. शासन स्तरावर एफआरपी बाबत अधिकृत परिपत्रक स्पष्ट नसल्याने कारखाना प्रशासनाने पहिली उचल जाहीर केली आहे. एफआरपीपेक्षा अधिकचा ऊस दर देणारा कारखाना अशी माळेगाव कारखान्याची ओळख आहे. मागील गाळप हंगामात उसाच्या गाळपासह अन्य उपपदार्थांचे विक्रमी उत्पादन घेतले होते.

चालू गाळप हंगामात कारखान्याने 43 दिवसांमध्ये 3 लाख 32 हजार 690 टन उसाचे गाळप करून सरासरी 9.69 साखर उतार्‍याने 3 लाख 12 हजार 400 साखर पोत्यांचे उत्पादन घेतले. तसेच 2 कोटी 41 लाख 46 हजार 200 वीज युनिटची निर्मिती करून यामधील 1 कोटी 41 लाख 8 हजार 640 वीज युनिटची विक्री केली आहे. तर कारखाना प्रतिदिन सरासरी 9 हजार टन ऊस गाळप करीत आहे.
दरम्यान, ज्या ऊस उत्पादक शेतकरी बांधवांचा 15 नोव्हेंबरपर्यंत ऊस तुटून आला आहे, त्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावर पुढील आठवड्यात सदरची रक्कम वर्ग करण्यात येईल. यात सभासदांसह गेटकेनधारकांचा समावेश आहे, असे कारखाना प्रशासनाकडून सांगण्यात आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news