बारामतीत नायलॉन मांजाने चिरला एकाचा गळा | पुढारी

बारामतीत नायलॉन मांजाने चिरला एकाचा गळा

बारामती; पुढारी वृत्तसेवा: बारामती शहरात नायलॉन मांजामुळे एकाचा गळा चिरला गेला. यामुळे त्या व्यक्तीला 26 टाके पडले आहेत. केवळ नशीब बलवत्तर म्हणून ते यातून वाचले. नितीन काका वणवे असे त्यांचे नाव आहे, असाच प्रकार काही दिवसांपूर्वी इंदापूर शहरात घडला आहे. शहर पोलिसांनी गेल्या आठवडाभरात नायलॉन मांजा विक्रेत्यांविरोधात कारवाई केली; परंतु तरीही शहरात चोरून मांजा विकला जात असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे.

शुक्रवारी (दि. 5) संध्याकाळी आपले काम आटोपून घरी निघालेले नितीन काका वणवे आपल्या दुचाकीवरून इंदापूर रस्त्याच्या मागील बाजूने निघाले होते, मात्र काही कळायच्या आत त्यांच्या गळ्याला नायलॉन मांजा कापल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली.  या दुखापतीमुळे त्यांच्या गळ्याला जवळपास 26 टाके घालावे लागले. नितीन यांचे नशीब बलवत्तर म्हणून त्यांच्या स्वरयंत्राला इजा झाली नाही किंवा मुख्य नसांना धक्का लागला नाही. मात्र, तरीही त्यांच्या जिवावरच बेतले होते.

पोलिसांच्या इशार्‍याला जुमानेना कोणी
बारामती शहरात केवळ मांजा विक्रेतेच नाही, तर या मांजाने पतंग उडविताना कोणी आढळला तर त्याच्यावरही कारवाईचा पोलिसांनी इशारा देऊनही अजूनही नागरिकांकडून सर्रास हा मांजा वापरला जात असल्याने चिंतेचे वातावरण आहे.

वणवे यांना या घटनेत मोठी इजा झाली. परंतु, केवळ नशीब बलवत्तर म्हणून स्वरयंत्राला इजा पोहोचली नाही. आत-बाहेर मिळून 26 टाके घालावे लागले. नायलॉन मांजा वापरणार्‍यांवर कडक कारवाई व्हायला हवी.
                                                                                     – डॉ. संजय पुरंदरे

Back to top button