घर घर तिरंगा… हर घर तिरंगा! स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या कार्यक्रमात पुणे अव्वल | पुढारी

घर घर तिरंगा... हर घर तिरंगा! स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या कार्यक्रमात पुणे अव्वल

पुणे; पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यात सध्या राज्यात पुणे, तर देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद
यांनी दिली. जिल्हा परिषदेत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन घाडगे उपस्थित होते. आयुष प्रसाद म्हणाले, ‘सध्या पुणे पहिल्या क्रमांकावर असले तरी, त्यात बदल होण्याची शक्यता आहे. या उपक्रमात जिल्ह्यात साडे 21 लाख घरांवर तिरंगा लावण्यात येणार आहे.

प्रत्येक राज्य व जिल्ह्याला स्पर्धात्मक पातळीवर सहभागी करून घेण्यात आले आहे. त्यानुसार सर्व राज्यांचे मूल्यांकन करण्यात येत आहे. या उपक्रमासाठी जिल्हा परिषदेने सर्व पंचायत समित्यांसाठी प्रत्येकी 5 लाखांचा निधी दिला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सुमारे साडेएकवीस लाख घरांवर तिरंगा लावण्याचे नियोजन आहे. त्यासाठी अनेक माध्यमांतून तिरंगा विक्री करण्यात येत आहे. जिल्ह्यात वेगवेगळ्या आकारांतील झेंडे वितरित करण्यात येणार आहेत. त्याची किंमत 20 रुपयांपासून पुढे ठेवण्यात आली आहे. यासाठी कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) निधीची मदत घेण्यात येत आहे.’

यांना मिळणार मोफत झेंडा…
अंत्योदय योजनेतील लाभार्थी, तसेच निराधारांना मोफत झेंडा देण्याचा विचार आहे. त्यासाठी अनेक कंपन्यांना आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात 1 लाख 46 हजार अंत्योदय योजनेतील लाभार्थी आहेत, तर 84 हजार निराधार आहेत. जिल्ह्यात 10 ते 12 ऑगस्ट दरम्यान जिल्हा स्तरावर विविध कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे प्रसाद यांनी सांगितले.

 

Back to top button