हडपसर, मांजरीत नालेसफाई, चेंबर दुरुस्ती, रस्ते व खड्डयांच्या डागडुजीचा महापालिकेचा दिखावा | पुढारी

हडपसर, मांजरीत नालेसफाई, चेंबर दुरुस्ती, रस्ते व खड्डयांच्या डागडुजीचा महापालिकेचा दिखावा

हडपसर; पुढारी वृत्तसेवा: पावसाच्या संततधारेमुळे हडपसर, मांजरी परिसरातील अनेक रस्ते आणि चौकांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या भागातील ठिकठिकाणी रस्ते उखडले असून, तयार झालेल्या खड्ड्यांनी वाहने खिळखिळी करून टाकली आहेत. दैनंदिन कामानिमित्त बाहेर पडणारे नागरिक आणि विद्यार्थी यामुळे मेटाकुटीला आले आहेत. हांडेवाडी रोड रेल्वे क्रॅासिंग, चिंतामणी नगर, सातव नगर व भुजबळ चौक, सय्यदनगर रेल्वे फाटकाजवळील परिसर खड्डे, राडारोडा आणि साचलेल्या पाण्याच्या चक्रव्यूहात अडकला आहे. मलमपट्टी केलेले रस्ते व खड्डे पावसाने उघडे पडलेले आहेत.

हे खड्डे, साचलेले पाणी यामुळे वाहनांचा वेग कमी होऊन ठिकठिकाणी वाहतूक कोंडीलाही सामोरे जावे लागत आहे. अण्णासाहेब मगर महाविद्यालयासमोर, रविदर्शन चौक, गाडीतळ पुलाखालील परिसर, गांधी चौक, डीमार्ट रस्ता, डीपी रस्त्यावरील चौक या भागातही हीच परिस्थिती दिसत आहे. नालेसफाई, चेंबर्स दुरुस्ती, रस्ते व खड्ड्यांची डागडुजी ही कामे म्हणजे महानगरपालिकेने केलेला केवळ दिखावा होता, हे पावसाने उघडे पाडले आहे.

ससाणे नगर येथे पावसाळ्यात जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या खड्ड्यात पाणी साचत आहे. तर, नवनाथ चौकापासून हडपसर येथील दत्त मंदिरापर्यंत रस्त्याच्या डाव्या बाजूला पाण्याची लाईन टाकण्यासाठी खोदकाम केलेले आहे. त्यामुळे रस्त्यावर धोकादायक खड्डे निर्माण झाले आहेत. सगळीकडे राडारोडा पसरला आहे. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे.

याखेरीज, गोंधळेनगर येथील बनकर शाळेजवळ टी चौक, सर्व्हे नंबर 201 अमानोरा फायरस्टेशन रोडवरील सादबादादा तुपे कॉलनी, सर्व्हे नंबर 88/1 ते 5 जुनी म्हाडा कॉलनीच्या मुख्य इमारतीकडे जाणारा रस्ता, मगरपट्टा चौकातील अमरदिप गृह निर्माण सोसायटी याखेरीज याच चौकातील पालिकेच्या अण्णासाहेब मगर रुग्णालयासमोर पाणी साठण्यासह राडारोड्याच्या समस्या कायम आहेत. यामधून महापालिकेने नागरिकांची सुटका करावी, अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.

 

Back to top button