पुणे : तृतीयपंथीयाच्या मृत्यूत मारहाणीची नोंद नाही; वकिलांचा वाकड पोलिसांवर आरोप | पुढारी

पुणे : तृतीयपंथीयाच्या मृत्यूत मारहाणीची नोंद नाही; वकिलांचा वाकड पोलिसांवर आरोप

पुणे; पुढारी वृत्तसेवा: वाकड येथील बार हिस्ट हॉटेलमध्ये तृतीयपंथीयाला झालेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला आहे. मात्र त्यात मारहाणीची नोंद नाही, असा आरोप वकिलांनी केला आहे. या प्रकरणात पोलिस तपासात बर्‍याच गोष्टी उघड होत आहेत. मारहाण करणारे हॉटेल व्यावसायिक तसेच त्यांचे सुरक्षारक्षक असलेल्यांनी मारहाण केली असून, त्या मारहाणीत त्याचा मृत्यू झालेला आहे, असे स्पष्ट दिसून येत असूनही आवश्यक त्या कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही, असे वकिलांनी म्हटले आहे.

ट्रान्सजेन्डर व्यक्तींवर होणारे अन्याय, ट्रान्सजेन्डर लोकांसोबत होणारे भेदभाव व कायद्याची अंमलबजावणी याविषयी सहयोग ट्रस्टच्या कार्यालयात आयोजित मीटिंगसाठी पुण्यातील ट्रान्सजेन्डर व्यक्तींच्या प्रतिनिधी मन्नत शेख, तृतीया संस्थेच्या अध्यक्ष कादंबरी, कशिश भालके, राहुल डांबले, सोनी धरावले, मीस्ट ऑर्गनायझेशनचे श्याम कोन्नुर, सिद्धांत आव्हाड, राहुल गजबे तसेच अनेक समलिंगी लिंग-परिवर्तन केलेल्या समूहातील 20 प्रमुख कार्यकर्ते व अ‍ॅड. असीम सरोदे व अन्य वकीलवर्ग उपस्थित होते. बार हिस्ट वाकड येथील हॉटेलमध्ये समलिंगी लोकांची पार्टी सुरू असताना अभय नावाच्या समलिंगी व्यक्तीचा बार मालक, बारचे बाउन्सर्स यांच्या मारहाणीतून झालेला खून केवळ अपघात दाखवणे व तशा प्रकारची कलमे लावणे हा पोलिसांचा हलगर्जीपणा आहे.

‘आरोपींना अटक करा’
या प्रकरणी कायद्याच्या चौकटीत चौकशी व तपास होऊन आरोपींना अटक करावी आणि त्यांच्यावर कलम 307, 302 नुसार गुन्हा नोंदवावा, अशी मागणी श्याम कोन्नुर व कादंबरी यांनी केली, तर तृतीयपंथी व्यक्तींचा हक्क व संरक्षणाचा कायदा 2019 मधील कलम 22 (इ) आणि 22 (फ) नुसार महाराष्ट्रातील सगळ्या महानगरपालिकांनी असे नियम करण्याची गरज आहे, असे अ‍ॅड. असीम सरोदे यांनी सांगितले.

 

Back to top button