पारगाव : भागडेश्वर परिसर पर्यटकांना खुणावतोय | पुढारी

पारगाव : भागडेश्वर परिसर पर्यटकांना खुणावतोय

पारगाव; पुढारी वृत्तसेवा: आंबेगाव तालुक्यातील एकमेव लेणी असलेल्या वळती गावच्या पूर्वेकडील भागडेश्वर परिसर सध्या हिरवळीने नटला आहे. सध्या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पर्यटकांना हा डोंगर जणू खुणावत आहे. भागडेश्वर डोंगराच्या उत्तरेकडून औरंगपूर, पूर्वेकडून भागडी, दक्षिणेस वळती आणि पश्चिमेला गांजवेवाडी अशी या गावांच्या मध्ये दक्षिणोत्तर जवळपास तीन ते चार किलोमीटरपर्यंत पसरलेली डोंगररांग आहे.

याच डोंगर माथ्यावरून आपणास औरंगपूर ते भागडेश्वर असा ट्रेक करता येतो. डोंगरकपारीत वसलेल्या लेणीत 12 – 13 व्या शतकातील दोन दगडी शिल्प व एक मोठी दगडी गणेशमूर्ती आहे. ही मूर्ती हरिचंद्रगडावरील दक्षिण लेणीतील गणेशमूर्तीप्रमाणे भासते. या लेणीच्या तोंडावर कोरीव दगडी बांधकाम होते. त्यानंतर वळती ग्रामस्थांनी नवीन सिमेंट मंदिर उभारले.

दिवसेंदिवस भागडेश्वर परिसराला पर्यटक भेटी देत आहेत. वळती गाव व परिसरातील भाविकभक्तदेखील भागडेश्वर मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करत असतात. येथे लवकरात लवकर पर्यटन केंद्र सुरू होणे गरजेचे आहे.

                                           – अनिल वाजे माजी अध्यक्ष, वन समिती वळती

 

Back to top button