शहर राष्ट्रवादीमध्ये खदखद? निर्धार मेळाव्यास ‘बिग बॉस’ गैरहजर | पुढारी

शहर राष्ट्रवादीमध्ये खदखद? निर्धार मेळाव्यास ‘बिग बॉस’ गैरहजर

नंदकुमार सातुर्डेकर : पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीत सर्वकाही आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत शनिवार (दि.6) झालेल्या कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यास आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे व माजी शहराध्यक्ष तथा माजी महापौर योगेश बहल यांची अनुपस्थिती हा चर्चेचा विषय झाला होता. पिंपरी- चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्षपदी याआधी माजी महापौर संजोग वाघेरे विराजमान होते; मात्र त्यांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतरही पक्षाने नवीन अध्यक्ष नियुक्त न केल्याने पक्षामध्ये खदखद होती. त्यानंतर शहराध्यक्षपदी अजित गव्हाणे यांची नियुक्ती झाली; मात्र पक्षातील ज्येष्ठ नेते अस्वस्थ असल्याचे समजते.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत भोसरीत राष्ट्रवादीचा मेळावा झाला होता. यावेळी नवीन चेहर्‍यांना संधी देत असताना जुन्या ज्येष्ठांना डावलू नका, शहराच्या भवितव्यासाठी सर्वजण हातात हात घालून काम करा, असे आवाहन त्यांनी केले होते; मात्र पदाधिकारी एककल्ली कारभार करत असल्याने ज्येष्ठ नाराज असल्याचे समजते. याआधी अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड दौरा केला, त्यावेळी त्या दौर्‍यातही आमदार अण्णा बनसोडे व माजी आमदार विलास लांडे यांची अनुपस्थिती होती. एवढेच नव्हे तर विश्वासदर्शक ठरावाच्या वेळीही अण्णा बनसोडे हे अनुपस्थित होते. बनसोडे यांच्या नाराजीचे नक्की कारण काय? याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

लांडे व बनसोडे यांच्या नाराजीची चर्चा असतानाच आता त्यात माजी महापौर तथा शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या नावाची भर पडली आहे. शनिवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यास बहल हेही अनुपस्थित होते. मेळाव्यातील अनुपस्थितीबाबत विचारले असता, विलास लांडे म्हणाले की, मी आजारी आहे. माझा मुलगा माजी नगरसेवक विक्रांत लांडे हा मेळाव्यास उपस्थित होता.
योगेश बहल यांना विचारले असता ते म्हणाले की, बेंगलोर येथे माजी नियोजित बैठक होती. राष्ट्रवादीचा मेळावा अचानक ठरवला गेला. त्यामुळे मी उपस्थित राहू शकणार नसल्याचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांना सांगितले होते.

आमदार अण्णा बनसोडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा फोन नॉट रिचेबल लागत होता. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने सुलक्षणा शिलवंत धर यांना उमेदवारी जाहीर केली होती विविध खेळया करून बनसोडे यांनी उमेदवारी मिळवली.त्यावेळी योगेश बहल यांनीही बनसोडे यांच्यासाठी प्रयत्न केले होते. स्पर्श घोटाळा प्रकरणामुळेही बहल व धर वाद उफाळून आला होता.त्यातच भाजपने माजी नगरसेविका सुजाता पालांडे यांना भाजप महिला मोर्चा प्रदेश मीडिया प्रमुखपद देऊन बहल यांचा ताण वाढवला आहे त्यामुळे बहल काही वेगळा निर्णय घेणार का अशी चर्चा आहे.

राष्ट्रवादीच्या मेळाव्यास आजी-माजी आमदारांच्या असलेल्या अनुपस्थितीबद्दल पत्रकार परिषदेत अजित पवार यांना विचारण्यात आले असता, माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची काळजी करू नका. बनसोडे आजारी आहेत, तर लांडे हे तिरुपतीला गेल्यानंतर त्यांना किरकोळ अपघात झाल्याने आराम करत आहेत. त्यांचा मुलगा मेळाव्यास उपस्थित आहे. बनसोडे व विलास लांडे नसले तरी त्यांच्या जागी दुसरे दोघे वाढू शकतात असा टोलाही पवार यांनी हाणला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी फडणवीस यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळी आ. बनसोडे यांनी त्यांची पाठराखण केली होती मात्र ते अजित पवार व राष्ट्रवादीवर नाराज का आहेत याबाबत शहरवासीयांना उत्सुकता आहे.

Back to top button