पुणे : ‘डिओं’च्या ‘त्या’ कारभाराला चाप | पुढारी

पुणे : ‘डिओं’च्या ‘त्या’ कारभाराला चाप

पुणे; पुढारी वृत्तसेवा: ठाण्याच्या कारभारातील काही गोष्टी सहपोलिस आयुक्तांच्या कानावर गेल्याचे त्यांनी गैरप्रकार निदर्शनास आला, तर थेट पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि ड्यूटी वाटप करणारा अधिकारी (डिओ) या दोघांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे कर्तव्य वाटपातून आर्थिक उद्दिष्ट साधणार्‍या डिओ मंडळींफचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. पोलिस आणि महसूल खात्यातील मलाईदार पोस्टिंग हा विषय काही नवा नाही.

प्रत्येक जण आपली ताकद वापरून योग्य ठिकाणी बसण्यासाठी प्रयत्न करीत असतो, हे सर्वश्रुत आहे. मात्र, पोलिस ठाण्यातदेखील चांगले कर्तव्य देण्यासाठी ड्युटी वाटप करणार्‍या अधिकार्‍यांकडून रेटिंगचे आर्थिक सेटिंग केले जात असल्याची माहिती आहे. आता हाच प्रकार सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गांभीर्याने घेतला असून, एक प्रकारे त्यांनी ङ्गडिओफच्या गैरकारभाराला चाप लावल्याचे बोलले जाते आहे. पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त यांनादेखील याबाबत लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

पोलिस ठाण्यातील सर्व कर्मचार्‍यांना (अंमलदार) दैनंदिन कर्तव्य वाटपाची जबाबदारी डिओंवर असते. कर्मचार्‍यांना रात्रपाळी, दिवसपाळी देणे, त्यांच्या रजेच्या संदर्भातील नोंदी रजिस्टरमध्ये ठेवणे, सर्व कर्मचार्‍यांच्या सुट्ट्या व रजा यांचा ताळमेळ घालून ठाण्यात मनुष्यबळाचे नियोजन करणे, अशी विविध कामे तो करीत असतो. त्यामुळे कर्मचार्‍यांसोबत त्याचा नियमित संपर्क येतो. खरे तर डिओने रोटेशन पद्धतीने सर्व कर्मचार्‍यांना कर्तव्य देणे अभिप्रेत आहे. मात्र, असे होताना दिसत नाही.

मर्जीतल्या आणि आर्थिक हितसंबंध जपणार्‍या कर्मचार्‍यांनाच डिओ कडून खास कर्तव्य दिले जाते. चांगल्या ठिकाणी मार्शल ड्युटी, आरामाच्या ठिकाणी नेमणूक, सुट्टीवर जाण्यासाठी अशा विविध कारणांतून डिओ मंडळी आपले आर्थिक उद्दिष्ट साधत असल्याचे बोलले जाते आहे. काही पोलिस ठाण्यांच्या डिओंवर दुहेरी कर्तव्य असल्याचीदेखील माहिती आहे.

प्रभारी अधिकार्‍याची खास मर्जी सांभाळून ही मंडळी काम पाहतात. बरं एका ठिकाणी हे कर्तव्य केले, तर बदली झालेल्या दुसर्‍या ठिकाणी गेल्यानंतरदेखील त्यांना हा मोह सुटत नाही. परत ते आपले सर्व अदृश्य हात वापरून त्या पदावर विराजमान होतात. त्यामुळे डिओ मंडळींवरचा वाढता ताण पाहता सहपोलिस आयुक्तांनी त्यांची गांभीर्याने दखल घेत लक्ष ठेवण्यास सुरुवात केल्याचे बोलले जाते आहे.

Back to top button