स्वतःचा लग्न सोहळा म्हणत जिंकली ग्रामपंचायत निवडणूक! पुणे जिल्ह्यातील या अनोख्या विवाह सोहळ्याची चर्चा | पुढारी

स्वतःचा लग्न सोहळा म्हणत जिंकली ग्रामपंचायत निवडणूक! पुणे जिल्ह्यातील या अनोख्या विवाह सोहळ्याची चर्चा

टाकळी हाजी, पुढारी वृत्तसेवा: टाकळी हाजी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पहिल्याच प्रचार सभेत दामूशेठ घोडे यांनी, ‘ही माझी निवडणूक नसून, माझे लग्न आहे,’ असे विधान केले होते. या विधानावर समोरच्या पॅनेलकडून जोरदार टीका करण्यात आली होती. ५ ऑगस्ट रोजी निवडणुकीच्या निकालानंतर मात्र घोडे यांनी लग्नसोहळा संपन्न करीत अगदी लग्नातील सर्व विधी पार पाडून त्यांचा शब्द खरा करून दाखविला. शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दामूशेठ घोडे यांच्या पॅनेलने १६-०१ असा दणदणीत विजय संपादित केला आहे.

यापूर्वी दामूशेठ घोडे यांनी त्यांच्या प्रभागामधून सलग पंधरा वर्षे बिनविरोधाची परंपरा राखली होती. परंतु, या निवडणुकीत माजी आमदार पोपटराव गावडे यांच्याबरोबरचे राजकीय मतभेद ताणले गेल्याने त्यांना निवडणुकीला सामोरे जावे लागले. घोडे यांनीसुद्धा एकही जागा बिनविरोध होऊ नये म्हणून सर्व सतरा जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केले. काही जागांवर समोरच्या पॅनेलचे तगडे उमेदवार पाहून त्यांच्याविरोधात कुणीही लढायला तयार होत नसल्याचे पाहून या ठिकाणी घाेडे यांनी आपल्याच घरातील उमेदवार उभे केले.

प्रचाराच्या पहिल्याच सभेत दामूशेठ घोडे यांनी लोकांना भावनिक आवाहन करताना, ‘ही निवडणूक नसून, हे माझे लग्न आहे. मी चार नंबर प्रभागाचा नवरदेव आहे, तर एक नंबर प्रभागामधून अरुणाताई माझी नवरी असून, दोन नंबर प्रभागातील त्यांची उभी असलेली सूनबाई ही आमची कलवरी आहे. तुम्ही सर्वजण माझे वऱ्हाडी आहात आणि निकाल म्हणजेच माझे लग्न असेल,’ अशा प्रकारे केलेल्या विधानावर ‘बोलतो ते करतो आणि करतो तेच बोलतो’ हे सिध्द करीत निकाल लागल्यानंतर टाकळी हाजी येथील कुंड पर्यटनस्थळ येथील मंगल कार्यालयात जाऊन एक अनोखा विवाहसोहळा संपन्न केला. या दिमाखदार सोहळ्याची सर्वत्र चर्चा होत असून, चक्क या विवाहसोहळ्यास घोडे दाम्पत्याची मुले, सुना, नातवंडेसुद्धा उपस्थित होते.

Back to top button