भाजपचे मिशन बारामती सुरु; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १६ पासून मतदारसंघाच्या तीन दिवसीय दौऱ्यावर | पुढारी

भाजपचे मिशन बारामती सुरु; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १६ पासून मतदारसंघाच्या तीन दिवसीय दौऱ्यावर

बारामती, पुढारी वृत्तसेवा: गत लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना घाम फोडणाऱ्या भाजपने २०२४ च्या निवडणूकीसाठी बारामती मतदार संघावर आत्तापासूनच लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी विशेष मिशन भाजपने हाती घेतले असून त्या अंतर्गत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या १६ ऑगस्टपासून तीन दिवसीय बारामती मतदारसंघाच्या दौऱ्यावर येणार आहेत.

भाजपचे नेते अविनाश मोटे यांनी सितारामन या दौऱ्यावर येत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. लोकसभेच्या गत निवडणूकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना कांचन कुल यांच्या माध्यमातून तगडे आव्हान दिले होते. त्यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांच्यापासून ते अनेक दिग्गजांच्या सभा मतदारसंघात झाल्या होत्या. आता २०२४ च्या निवडणूकीत पूर्ण ताकदीनिशी उतरण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. मतदारसंघातील स्थिती गत निवडणुकीच्या तुलनेत अनुकुल झाल्याचे भाजपचे म्हणणे आहे. आगामी निवडणुकीत सुळे याच राष्ट्रवादीच्या उमेदवार असणार आहेत. त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार भाजपकडून दिला जाईल हे निश्चित. त्यासाठी मतदारसंघात आत्तापासूनच संपर्क वाढविण्यावर भाजपने भर दिला आहे.

या संपर्क अभियानाची सुरुवात अर्थमंत्री सितारामन यांच्या दौऱ्यापासून होणार आहे. त्यानंतर विविध केंद्रीय मंत्री बारामती लोकसभा मतदार संघात दौरे करणार आहेत. २०२४ च्या निवडणूकीपर्यंत हा कार्यक्रम सुरुच राहणार आहे. यानिमित्ताने राष्ट्रवादीला घेरण्याची व्युहरचना भाजपकडून आखली जात आहे. १६ ऑगस्टपासून सितारामन यांचा दौरा सुरु होणार आहे. तीन दिवसीय दौऱ्यात त्यांच्यासमवेत बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी आणि आमदार राम शिंदे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्यासह विविध पदाधिकारी सहभागी होणार आहेत. १६ ऑगस्ट रोजी सितारामन या खडकवासला व भोर, दि. १७ रोजी इंदापूर व दौंड तर दि. १८ रोजी बारामती व पुरंदरला पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधणार आहेत. या सर्व ठिकाणी भाजपकडून स्वतंत्रपणे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दौऱ्याच्या तयारीसाठी ९ ऑगस्टला बैठक

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वात महत्त्वाचे स्थान असलेल्या आणि संपूर्ण देशाच्या तिजोरीच्या चाव्या हाती असलेल्या सितारामन यांच्या दौऱ्याचे काटेकोर नियोजन भाजपकडून केले जात आहे. त्यासाठी ९ ऑगस्ट रोजी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत बारामतीत भाजपाची बैठक पार पडणार आहे.

आत्तापासून व्युहरचना

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन या २०२४ च्या निवडणूकीसाठी आत्तापासूनच बारामती लोकसभा मतदार संघासाठी व्युहरचना करणार आहेत. भाजपविरोधात देशभरात मोट बांधण्यामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार हे महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे त्यांच्या घरच्या मतदारसंघात जोरदार टक्कर देण्याचा यानिमित्ताने भाजपचा प्रयत्न असेल. त्यासाठी आत्तापासूनच रणनिती आखली जात आहे. नजीकच्या कर्जत-जामखेडचे प्रतिनिधित्व केलेल्या आणि सध्या विधान परिषदेचे आमदार असलेल्या राम शिंदे यांची लोकसभा प्रभारीपदी निवड करत भाजपने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे.

Back to top button