कामरगाव तलाव सांडव्याची दुरवस्था | पुढारी

कामरगाव तलाव सांडव्याची दुरवस्था

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा : कामरगाव येथे भोरवाडी शिवेलगत पाझर तलाव बांधण्यात आला. त्यावेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे सांडव्यातून अतिरिक्त पाणी वाहण्यासाठी हा सांडवा हँड ग्रेनेडने खिळखिळा करण्यात आला होता, नंतर याची दुरुस्ती होणे आवश्यक होती, तरी पुढे तो तसाच राहिला आणि यातून आता पाण्याची गळती होते. ही दुरुस्ती झाली, तर वर्षभर पूरेल इतके पाणी या तलावात राहील, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही दुरुस्ती करावा, अन्यथा आंदोलनाच्या तयारीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
लघुपाटबंधारे विभागाकडून सुमारे 52 वर्षांपूर्वी नगर तालुक्यातील कामरगाव येथे भोरवाडी शिवेलगत पाझर तलाव बांधण्यात आला.

1966 साली सुरू झालेले काम 1970 साली पूर्ण झाले. यासाठी अनेक भूमिपुत्रांनी बागायती जमिनीवर पाणी सोडले, त्यातील काही भूमिहीनही झाले होते. या तलावात साठवण क्षमतेपेक्षा जास्त पाणी झाल्यास विसर्ग व्हावा म्हणून सांडवा काढला होता. काम पूर्ण झाले, त्यावेळेस झालेल्या ढगफुटीमुळे तलाव पूर्ण भरलेला होता, तो फुटू नये व सांडव्यावरून पाणी वाहून जावे यासाठी तत्कालीन ठेकेदाराने हँड ग्रेनेड टाकून सांडवा खिळखिळा केला होता. तेव्हापासून या सांडव्यातून तलावाच्या पाण्याची मोठ्या प्रमाणावर गळती होते. ही गळती थांबली, तर वर्षभर पाण्याचा साठा राहू शकेल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

सांडव्याची गळती थांबवून काम पूर्ण करावे यासाठी ग्रामस्थांनी वेळोवेळी निवेदने दिलेली आहेत. त्याची दखल जलसंपदा विभागाकडून घेण्यात आलेली नाही. सध्या पावसाचे प्रमाण कमी असल्याने व तलावात पाणीसाठा अल्प असल्याने काम त्वरित होऊ शकते. त्यासोबत तलावावर तीन ते चार मीटर उंचीची झाडे वाढलेली असून, त्यांच्या मुळांपासून तलावाच्या भिंतीला धोका होऊ शकतो; त्यामुळे ही झाडे हटविण्याची गरज आहे. कामरगावसह, भोरवाडी, अकोळनेर, चास, खडकी, खंडाळा या गावांसाठी हा तलाव वरदान ठरला असून, तलाव भरल्यानंतर विहिरी, विंधन विहिरीना उन्हाळ्यातही पाणी उपलब्ध होते.

हा तलाव नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी, कापूरवाडीनंतर तिसर्‍या क्रमांकाचा तलाव आहे. या तलावाची तातडीने दुरुस्ती झाल्यास या गावांचा पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न वर्षभरासाठी सुटणार आहे. या दोन्ही बाजूंचा विचार करता जलसंपदा विभागाने लक्ष वेधण्यासाठी सरपंच तुकाराम कातोरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य संदीप ढवळे, अ‍ॅड. प्रशांत साठे, शिवाभाऊ सोनवणे, प्रा. मारुती आंधळे, सोपान आंधळे, संतोष आंधळे, एकनाथ चौरे, ऋषिकेश आंधळे, प्रदीप साठे, राहुल जाधव आदींनी ग्रामस्थांनी तलावाची समक्ष पाहणी करून लेखी निवेदन जलसंपदा विभागाच्या शाखा अभियंता पी. बी. लोखंडे यांना दिले.

यावेळी झालेल्या चर्चेत त्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी तत्काळ संपर्क साधला व काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी डी. टी. मोरे, एन. के. भोर यांनी चर्चा केली. त्यावेळी शिष्ठमंडळाने समाधन व्यक्त केले. परंतु उचित कार्यवाही न झाल्यास व लेखी आश्वासन न दिल्यास येत्या 15 दिवसात नगर – पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलनाचा इशारा शिष्ठमंडळाकडून देण्यात आला.

कामरगावचा तलाव परिसरासाठी जीवनदायी असून, रखडलेले काम पूर्ण व्हावे. अन्यथा ग्रामस्थांना रस्त्यावर उतरावे लागेल.
-प्रशांत साठे, वकील

 

ग्रामस्थांनी तलावाच्या दुरुस्तीबाबत केलेली मागणी योग्य असून, प्रथम प्राधान्याने निधी उपलब्ध करून दिवाळीपूर्वी काम पूर्ण करू.
-पी. बी. लोखंडे,
शाखा अभियंता,

Back to top button