माळशेज घाट पर्यटकांच्या गर्दीने फुलला | पुढारी

माळशेज घाट पर्यटकांच्या गर्दीने फुलला

ओतूर; पुढारी वृत्तसेवा: नगर-कल्याण महामार्गावरील माळशेज घाट सध्या निसर्गसौंदर्याने नटला आहे. उत्तुंग डोंगर, कड्यांवर कोसळणारा पाऊस आणि पांढर्‍याशुभ्र धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी सध्या या भागात पर्यटकांची गर्दी होत आहे. धबधब्यांच्या पाण्यात ओलेचिंब भिजण्यासाठी व हिरवेगार गालिचे अंथरलेल्या डोंगररांगांवरून पुढे पुढे सरकणार्‍या ढगांची गर्दी न्याहाळण्यासाठी पर्यटक माळशेज घाटात येत आहेत.

बोगद्यातून जाणार्‍या रस्त्यावरील प्रवासाची मजा घेताना अनेक जण आपल्या कुटुंबासह येत आहेत. परिसर धबधब्याच्या पाण्यासह पर्यटकांच्या गर्दीने फुललेला दिसून येत आहे. मुंबईहून 126, तर पुण्याहून 118 किलोमीटर अंतर असलेल्या विलोभनीय माळशेज घाटात अलीकडच्या काळात एमटीडीसी व वन विभागाने घाट परिसरातील विकासकामे हाती घेतली आहेत. त्यातून पर्यटकांना अधिकाधिक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. यामुळे माळशेज घाटाला पर्यटकांची पसंती मिळत आहे.

Back to top button