पुणे : बीएसएनएलला अवकळा! अनेक कामे ‘आऊटसोर्स | पुढारी

पुणे : बीएसएनएलला अवकळा! अनेक कामे ‘आऊटसोर्स

शिवाजी शिंदे

पुणे : भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) च्या पुणे विभागाकडे 2020 पर्यंत 2200 कर्मचारी होते. आता केवळ साडेपाचशे कर्मचारी राहिले आहेत. ग्राहकांची कामे व्हावीत, यासाठी बीएसएनएलने बहुतांश कामे ‘आऊटसोर्स’ केली असून, उत्पन्नासाठी बीएसएनएल मालकीच्या जागाही भाड्याने देण्याच्या तयारीत आहे. दूरसंचार क्षेत्रातील बीएसएनएल कंपनीत देशभरात एक लाख 65 हजार कर्मचारी होते. मात्र, मागील दोन वर्षांत ‘व्हीआरएस’ राबविण्यात आली.त्यामुळे आता देशभरात केवळ ऐंशी हजार कर्मचारी सेवेत आहेत. पुणे विभागात एकूण संपूर्ण पुणे जिल्हा येतो. या ठिकाणी देखील आता केवळ साडेपाचशे कर्मचारी राहिले आहेत.

त्यातच दर महिन्याला निवृत्त होण्याचे प्रमाणही आहे. त्यातच फोरजी स्पेक्ट्रमची मागणी गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहे. परंतू फोरजी इंटनरेट कनेक्टीव्ही बीएसएनएलमार्फत सुरू झालेली नाही. त्यामुळे खासगी कंपन्यांकडे ग्राहकांचा कल वाढतोय. बीएसएनएलला ऑक्टोबरच्या आसपास फोरजी कनेक्टीव्हीटी मिळण्याची शक्यता आहे, असे पुणे विभागाचे प्रधान महाप्रबंधक अनिल धानोरकर यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘पुणे जिल्ह्यांत बीएसएनएलचे साडेआठशे मोबाईल टॉवर्स आहेत.

अन्य खासगी कंपन्यांचे याही पेक्षा तिपटीने अधिक मोबाईल टॉवर्स आहेत.ग्राहकांना चांगली सुविधा देण्यासाठी फोरजी सेवा आवश्यक आहे. ही सेवा सुरू झाल्यास ग्राहकांच्या घरावर पोल ऍन्टेना बसवून फोरजी सेवा देता येऊ शकते. मात्र,त्या ग्राहकाच्या घराजवळून ऑप्टीकल फायबर केबल कनेक्शन जाणे आवश्यक आहे. पुणे विभागात अजून पंधराशे ते सोळाशे मोबाईल टॉवर्स वाढवण्यासाठी आम्ही बीएसएनएलच्या मुख्य कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविला आहे.’ दरम्यान, बीएसएनएलची बहुतांश कामे आता आऊटसोर्स करण्यात आली आहेत. त्यामध्ये केबल टाकणे, लॅन्डलाईनची सुविधा पुरविणे, मेन्टेनन्स पाहणे यासारखी कामे आहेत.

लँडलाइनमध्ये घट…
लँडलाइन फोनची संख्याही घटली आहे. गेल्या वर्षभरात 25 ते 30 हजार लँडलाइन फोन ग्राहकांनी बंद केले आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यात केवळ एक लाखाच्या आसपास बीएसएनएलचे लँडलाइन ग्राहक आहेत. उत्पन्नासाठी मॉडेल कॉलनी, हडपसर, गोर्‍हे बुद्रुक येथील जागा भाडेतत्त्वावर दिल्या आहेत, असेही धानोरकर यांनी सांगितले.

Back to top button