बिबवेवाडी : हद्दीच्या वादात नागरिकांचे आरोग्य धोक्यात | पुढारी

बिबवेवाडी : हद्दीच्या वादात नागरिकांचे आरोग्य धोक्यात

बिबवेवाडी; पुढारी वृत्तसेवा: मार्केट यार्ड येथील आंबेडकरनगर झोपडपट्टीच्या परिसरातील कचरा उचलण्यासाठी महानगरपालिका व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संबंधित ठेकेदार यांच्यातील समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. झोपडपट्टीच्या कडेने प्रचंड दलदल व कचरा साचला असून, त्यामध्ये भटकी कुत्री, जनावरे व डुकरांचा उच्छाद जास्त आहे. परिणामी, या परिसरात दुर्गंधी मोठ्या प्रमाणात सुटली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीतील भुसार बाजार, केळी मार्केट व भाजीपाला मार्केट येथील कचरा झोपडपट्टीच्या बाजूला फेकला जातो. तसेच, झोपडपट्टीमधील काही कचरा हा भुसार बाजाराच्या हद्दीत टाकला जातो, हा कचरा नेहमी उचलण्यासाठी हद्दीच्या वादामुळे कचरा नेमका कोणी उचलायचा, कधी उचलायचा, कसा उचलायचा? हा प्रश्न नेहमी उपस्थित होतो. पावसाळ्याच्या दिवसामुळे ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर येते. त्यात कचरा मिसळला जातो. झोपडपट्टीच्या प्रवेशद्वाराजवळ अतिशय दलदल व दुर्गंधीयुक्त कचरा साठलेला असून, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, जनतेच्या आरोग्याची काळजी कोणते प्रशासन घेणार? असा संतप्त सवाल येथील महिलांनी व नागरिकांनी केला आहे.

आंबेडकरनगर, प्रेमनगर या झोपडपट्टीच्या परिसरात होत असलेल्या कचर्‍याबाबत माझ्याकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. त्या संदर्भात मी तत्काळ आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांची, अधिकार्‍यांची बैठक घेऊन या परिसरातील कचरा, पाणी, आरोग्य हे प्रश्न तातडीने सोडवण्याचे आदेश दिले आहे. याबाबतीत मी स्वतः सर्व गोष्टींवरती लक्ष ठेवून कार्यवाही करणार आहे.

– गणेश सोनवणे, सहायक आयुक्त, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय, पुणे महानगरपालिका

माझे गेले 35 ते 36 वर्षांपासून भुसार बाजारात धान्याचे गोडाऊन आहे. गोडाऊनच्या समोरच झोपडपट्टीतील कचरा, राडारोडा व माती टाकली जाते. दुकानाच्या समोर सतत दलदल असते. झोपडपट्टीतील नागरिक कामाला जाताना या ठिकाणी कचरा टाकून जातात. कचरा न उचलल्यामुळे सतत दुर्गंधी असते. आमच्या दुकानातील व्यवसायावर मोठा परिणाम झालेला आहे. बाजार समितीकडे सतत मागणी करून यावर कुठल्याही प्रकारचा निर्णय होत नाही. जर हे असेच राहिले, तर मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीला भाडे देणे बंद करावे लागेल.
                                         – मदन गांधी, भुसार बाजार व्यापारी, मार्केट यार्ड, पुणे.

आंबेडकरनगर झोपडपट्टीत निर्माण झालेला कचरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात टाकला जातो. तर, कृषी उत्पन्न बाजार समितीतील काही कचरादेखील झोपडपट्टीच्या बाजूने येता-जाता ग्राहक व बाजार समितीच्या हद्दीत संबंध घटकातून टाकला जातो. तो कचरा बरेच दिवस तसाच पडून राहतो, या संदर्भात मनपा अधिकार्‍यांशी चर्चा केली असता, अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही.
                                                                – संतोष नागरे, सामाजिक कार्यकर्ते

Back to top button