भोसरीमध्ये आढळला दुर्मीळ मलबार चापडा साप | पुढारी

भोसरीमध्ये आढळला दुर्मीळ मलबार चापडा साप

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : भोसरी-इंद्रायणीनगर येथील चिंतामणी रेसिडेन्सीमधील मंदिरात दुर्मीळ विषारी मलबार चापडा साप आढळला होता. त्यानंतर सर्पमित्र बाबा त्रिभुवन यांनी सापाला पकडून वनखात्याच्या अधिकार्‍यांकडे सुपूर्त केले. हा साप मंदिराच्या लोखंडी खांबाला वेटोळा घालून बसला होता. या ठिकाणाहून पुजारी जात असताना त्यांना साप आढळल्याने त्यांनी ही गोष्ट तेथील अशिष बिरादार यांना सांगितली.

त्यांनी सर्पमित्र त्रिभुवन यांच्यासोबत संपर्क साधला. यांनतर तत्काळ सर्पमित्र घटनास्थळावर दाखल झाले आणि त्यांनी सापाला पकडून वनविभाग अधिकार्‍यांकडे दिले. मलबार चापडा जातीचा साप हा विषारी पण लाजाळू असतो. मात्र, तो चिडला तर जलदगतीने हल्ला करतो. या जातीचा साप पुणे जिल्ह्यात आढळत नसून तो कोकण किनारपट्टी तसेच आंबोली भागात आढळतो, असे सर्पमित्र त्रिभुवन यांनी सांगितले.

Back to top button