पुणे : तोतया पोलिस मित्रांनी तरुणाला लुटले; बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी | पुढारी

पुणे : तोतया पोलिस मित्रांनी तरुणाला लुटले; बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पोलिस मित्र असल्याची बतावणी करून बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत मारहाण करून एका तरुणाला लुटल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी, विश्रामबाग पोलिसांनी ईरफान इस्माईल सय्यद (वय 30, रा. गंगा व्हिलेज, सय्यदनगर हडपसर), शंकर औदुंबर पकाले (वय 27, रा. कदमाकवस्ती, लोणी काळभोर), शरद रावसाहेब अहिरे (वय 24, रा. बाणेर, म्हाळुंगे), सुमित दादा सिताप (वय 19, रा. डी.पी.रोड, मनपा शाळेसमोर) या चौघांना अटक केली. याबाबत परमेश्वर जिवडे (वय 24, रा. आळंदी देवाची) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना 28 जुलै रोजी रात्री साडेसात ते आठ वाजताच्या दरम्यान भिडे पुलाकडे जाणार्‍या रोडवर व माती गणपती, नारायण पेठ तसेच वर्तकबाग, शनिवार पेठे येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण जिवडे हा दूध विक्रीचा व्यवसाय करतो. 28 जुलै रोजी सायंकाळी तो दूध विक्री करण्यासाठी आळंदी येथून शहरात आला होता. फोन आल्याने गाडी बाजूला घेऊन तो बोलत होता. त्यावेळी चौघे आरोपी तेथे आले. त्यांनी जिवडे याचा मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर ‘आम्ही पोलिस मित्र आहोत, तू येथे काय करतोस, आम्हाला पैसे दे, नाहीतर तुला खोट्या रेप केसमध्ये अडकवतो’, असे सांगून पैशांची मागणी केली.

मात्र, पैसे देण्यास जिवडे याने नकार दिला. त्यानंतर जिवडे याला लाथाबुक्क्यांनी आरोपींनी मारहाण केल्यानंतर पोलिस चौकीला घेऊन जातो, असे सांगून दुचाकीवर बसवून माती गणपती, नारायण पेठेत घेऊन गेले. तेथे मोबाईलमधील एक व्हिडीओ दाखवून, ‘याला पाहा कसे खोट्या रेप केसमध्ये अडकवले आहे, तो सध्या जेलमध्ये आहे. त्यामुळे तू आता पैसे दिले नाही तर तुलासुद्धा खोट्या रेप केसमध्ये अडकवून जेलमध्ये पाठवतो,’ असे म्हणत पुन्हा पैशांची मागणी केली. त्यावेळीदेखील जिवडे याने पैसे देण्यास नकार दिला.

अशा ठोकल्या बेड्या..
हा प्रकार घडल्यानंतर जिवडे घाबरला होता. त्याने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. हा प्रकार घडला त्यावेळी जिवडे याने आरोपींच्या दुचाकीचा क्रमांक लक्षात ठेवला होता. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यातदेखील ते चौघे कैद झाले होते. पोलिस उपनिरीक्षक राकेश सरडे, कर्मचारी हर्षल दुडम, अशोक माने, मयूर भोसले, राहुल मोरे यांच्या पथकाने गाडीच्या क्रमांकावरून आरोपीचा पत्ता शोधून काढला. त्यानुसार चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

Back to top button