शिल्पासमोरचे नक्षीदार खांब गायब; पालिकेच्या विद्युत विभागातील वरिष्ठांना नाही कल्पना | पुढारी

शिल्पासमोरचे नक्षीदार खांब गायब; पालिकेच्या विद्युत विभागातील वरिष्ठांना नाही कल्पना

पुणे; पुढारी वृत्तसेवा: महापालिकेने सिंहगड रस्त्यावर (नरवीर तानाजी मालुसरे रस्ता) राजाराम पूल चौकात साकारलेल्या ‘गड आला पण सिंह गेला’ या शिल्पासमोरील डेकोरेटिव्ह विद्युत पोल गायब आहेत. मुख्य खात्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना याबाबत कसलाही पत्ता लागू न देता क्षेत्रीय कार्यालय स्तरावरील अधिकार्‍यांनी परस्पर साधे विद्युत खांब उभे केले आहेत. याबाबत विद्युत विभागाच्या प्रमुखांना काडीचीही कल्पना नसल्याचे समोर आले आहे. महापालिकेने 70 लाख रुपये खर्च करून राजाराम पूल चौकात तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारीत ‘गड आला पण सिंह गेला’ या संकल्पनेवर शिल्प उभारण्यात आले आहे.

उड्डाणपुलाचे नियोजन असताना, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सायकल ट्रॅक आणि पदपथ काढून रस्ता रुंदीकरण सुरू असताना दुसरीकडे पदपथावर हे शिल्प उभारण्याचे काम सुरू होते. विशेष म्हणजे या शिल्पाला कला संचालनालयाची परवानगी मिळण्यापूर्वीच काम सुरू करण्यात आले होते. त्यामुळे हे शिल्प सुरुवातीपासून वादाच्या भोवर्‍यात होते. मात्र, नगरसेवकाच्या हट्टापुढे प्रशासनाचे काहीच चालू शकले नाही.

या शिल्पाचे उद्घाटन 19 फेब्रुवारी रोजी करण्यात आले. उद्घाटन झाल्यानंतर या शिल्पावर प्रकाश टाकण्यासाठी निर्माण केलेली यंत्रणा वारंवार बंद पडत असते. त्यामुळे अनेकवेळा शिल्प अंधारातच असते. या ठिकाणी शिल्पाच्या सुशोभिकरणाचा एक भाग म्हणून प्रत्येकी 50 हजार रुपये किंमत असलेले डेकोरेटिव्ह विद्युत पोल उभारण्यात आले होते. मात्र हे पोल आता या ठिकाणाहून गायब झाले आहेत. गायब झालेल्या डेकोरेटिव्ह विद्युत पोलच्या जागी साध्या प्रकारचे पथदिव्यांचे पोल उभे करण्यात आले आहेत. त्यावर अद्याप दिवे बसविण्यात आलेले नाहीत.

अधिकारी अंधारातच
शिल्पाच्या समोर उभे केलेले डेकोरेटिव्ह विद्युत पोल का काढण्यात आले, अशी विचारणा विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदुल यांच्याकडे केली असता, त्यांना याबाबत काहीच कल्पना नसल्याचे समोर आले. त्यांनी क्षेत्रीय कार्यालय स्तरावरील अधिकार्‍यांकडे विचारणा केल्यावर सुरुवातीला डेकोरेटिव्ह पोल बसविलेच नव्हते, असे उत्तर देण्यात आले. पुन्हा सांगण्यात आले की, नवीन डेकोरेटिव्ह पोल तुटल्याने काढून ठेवले आहेत. त्या जागी पथदिवे उभे केले आहेत. दरम्यान, नवीन असूनही 6 महिन्यांच्या आत डेकोरेटिव्ह पोल तुटले कसे असे सवाल उपस्थित होत आहेत.

Back to top button