शेअर ट्रेडिंगचा फंडा; 4 कोटींचा गंडा; दरमहा 24 टक्के परताव्याचे आमिष पडले महागात | पुढारी

शेअर ट्रेडिंगचा फंडा; 4 कोटींचा गंडा; दरमहा 24 टक्के परताव्याचे आमिष पडले महागात

पुणे; पुढारी वृत्तसेवा: शेअर ट्रेडिंगमधील गुंतवणुकीवर प्रत्येक महिन्याला 24 टक्के परतावा देण्याच्या बहाण्याने, एका व्यावसायिकाने दुसर्‍या व्यावसायिकाला तब्बल 4 कोटी 37 लाख 50 हजार रुपयांचा आर्थिक गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात अभिजित अप्पासाहेब वठार (वय 40, रा. ओकवड्स हिल सोसायटी, बाणेर) याच्या विरुद्ध एमपीडीए (महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण) कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.

न्यायालयाने त्याला आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याबाबत अभिजित धोंडीबा सावंत (वय 40, रा. सनसिटी रोड, सिंहगड) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार 15 जुलै 2020 ते 7 जानेवारी 2021 या कालावधीत नवले आयटी पार्क, ऑफिस नंबर 402 येथे घडला. वठारने त्याच्या एच. आर. एंटरप्राईजेस, फॉरेक्स ट्रेडिंग, शेअर ट्रेडिंग आणि रिरायझिंग कन्स्ट्रक्शन या कंपन्यांत गुंतवणूक केल्यास आकर्षक परतावा देण्याच्या बहाण्याने ही फसवणूक केल्याचे पोलिसांनी सांगितले. आतापर्यंत तिघांनी वठारविरुद्ध पोलिसांत तक्रारी केल्या आहेत. त्याने अशाच प्रकारे इतरांनादेखील गंडा घातल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सावंत ब्रोकरेजचा व्यवसाय करतात. त्यांची ट्रेडबिझ इंडिया एलएलपी नावाची कंपनी आहे. सावंत यांचे ऑफिस असलेल्या इमारतीत वठारचेदेखील कार्यालय आहे. 2020 मध्ये संग्राम घाडगे या मित्राने सावंत यांना वठारबद्दल माहिती दिली होती. त्यानुसार सावंत वठारला भेटले. त्यावेळी त्याने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो, याबाबत माहिती देऊन असंख्य लोकांनी कोट्यवधी रुपये त्याच्याकडे गुंतविल्याचे त्यांना सांगितले.

सावंत यांना विश्वास वाटावा म्हणून काही बँकेचे व्यवहारसुद्धा दाखवले. त्यानुसार सांवत यांनी सुरुवातीला 1 कोटी 70 लाख ऑनलाइनरीत्या वठारकडे सोपवले. त्यानंतर वठारने सावंत यांना जास्त नफा असल्याचे सांगून रोख रक्कम गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यासाठी करारनामादेखील करून दिला. रोख व कंपनीच्या खात्यातून सावंत यांनी वठार याला 4 कोटी 88 लाख रुपये दिले. मात्र, ठरल्यानुसार पैसे न देता वठारने परत सावंत यांना गुंतवणूक केलेले पैसे व नफा असा 5 कोटी रुपयांचा कंपनीच्या नावे कोल्हापूर येथील कार्यालयात 17 डिसेंबर 2020 मध्ये गुंतवणूक करारनामा करून दिला.

सावंत यांना विश्वास वाटावा म्हणून वठारने गुंतवणूक केलेल्या पैशांचे चेकदेखील त्यांना दिले. मात्र, तारखेच्या अगोदरच दिलेला पाच कोटी रुपयांचा चेक बँकेत वटवण्यासाठी टाकू नका, कारण कंपनीचे पैसे दुसर्‍या व्यवसायात अडकल्याचे सांगत होता. सावंत यांनी एकेदिवशी त्याने दिलेले सर्व चेक बँकेत जमा केले. मात्र, खात्यावर पैसे नसल्यामुळे सर्व चेक बाऊन्स झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सावंत यांनी वठारसोबत संपर्क केला असता, त्याने तो विदेशात असल्याचे सांगून वेळ मारून नेत होता.

मात्र, सावंत यांनी वारंवार त्याचा पाठपुरावा केला असता वठारने ‘मी तुम्हाला खोट्या केसमध्ये अडकविले,’ असे सांगितले. सावंत यांनी वेळोवेळी रोख व कंपनीच्या खात्यातून वठारकडे गुंतविलेल्या पैशातून 62 लाख 25 हजार रुपये परत देऊन 4 कोटी 37 लाखांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर सावंत यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली होती.

प्रलोभन पडले महागात
वठार याने सावंत यांना गुंतवणुकीवर 25 ते 50 टक्के व त्यापेक्षाही अधिक परतावा देण्याचे प्रलोभन दाखवले. जेवढी जास्त गुंतवणूक तेवढा जास्त नफा, असे सूत्र सांगितले. सावंत यांनी वेळोवेळी 1 कोटी 70 लाख रुपये हवाली केले. काही दिवसांनी 50 लाख रुपये सावंतांच्या खात्यावर जमा केले. हा नफा असून मूळ रक्कम शिल्लक असल्याचे सांगितल्याने सावंत आणखी अडकत गेले.

वठारविरुद्ध यापूर्वी
चतुःशृंगी व अंबाजोगाई पोलिस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. त्याने दहा ते पंधरा लोकांची अशाप्रकारे फसवणूक केल्याची शक्यता आहे. त्यानुसार आमचा तपास सुरू आहे. अशाप्रकारे कोणाची फसवणूक झाली असेल, तर त्यांनी गुन्हे शाखेशी संपर्क करावा.
– नारायण शिरगावकर,
सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा

Back to top button