निमगाव दावडी : पावसाने दडी मारल्याने खरीप धोक्यात | पुढारी

निमगाव दावडी : पावसाने दडी मारल्याने खरीप धोक्यात

निमगाव दावडी, पुढारी वृत्तसेवा: जुलै महिन्याच्या निम्म्या काळात पाच ते सहा दिवस पावसाने सर्वत्र चांगली हजेरी लावली होती. दमदार पावसाने धरणे पूर्ण क्षमतेने भरली. ओढे, नाल्यांना चांगले पाणी वाहू लागले, परंतु त्यानंतर वीस दिवस होऊन गेले तरी पावसाने दडी मारली आहे, त्यामुळे खरीप हंगाम वाया गेल्यात जमा झाला आहे.

दिवसेंदिवस पावसाचे वेळापत्रक अनिश्चित झाल्याने शेतकरी पूर्ण संकटात सापडला आहे. अनेक भागात बटाटा लागवडी थांबल्या आहेत. जिथे लागवडी झाल्या आहेत, तेथे बियाणांस अंकुर आले आहेत, परंतु पाऊस नसल्याने कोवळे मोड जळून चालले आहेत. खेडच्या पूर्व भागात फारसा पाऊस झाला नाही. पावसाळ्यातील दोन महिने झाले आहे, तरी भूजल पातळी वाढलेली नाही. विहिरी, धरणे, तलाव कधी भरणार याची चिंता लागली आहे. खेडच्या पश्चिम भागांत मुख्य पीक भात आहे. शेतक-यांनी भात आवणी केली आहे, परंतु पावसाने दडी मारल्याने खाचरांतील पाणी कमी होत चालले आहे.

Back to top button