मंचर: बीट पिकाला चांगला बाजारभाव | पुढारी

मंचर: बीट पिकाला चांगला बाजारभाव

पारगाव, पुढारी वृत्तसेवा: बीट पिकाला बाजारभाव चांगला मिळत आहे. त्यामुळे बीट उत्पादक शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे. पावसाने उघडिप दिल्याने आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात बीट पिकाची काढणीची कामे जोरात सुरू आहे. तालुक्यात मंचर येथे कृषी मालाची मोठी बाजारपेठ आहे. मंचरनजीक चांडोली, खडकी, पिंपळगाव, थोरांदळे, नागापूर, रांजणी, वळती, शिंगवे, पारगाव आदी गावांमध्ये बीट उत्पादक शेतकरी जास्त आहेत. बीट पिकाला भांडवल कमी लागते आणि बाजारभावदेखील सातत्याने चांगला मिळतो. तसेच या पिकाला वजन अधिक असते.

रांजणी येथील शेतकरी जयसिंग थोरात यांनी बीटाचे पीक घेतले आहे. त्यांना बीटाला सध्या प्रतिदहा किलोस 250 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला आहे. थोरात म्हणाले, ‘मध्यंतरी पडलेल्या अतिपावसाचा फटका बीटापिकाला बसला. अनेक शेतकर्‍यांच्या शेतांत पाणी साचून राहिल्याने बीट उत्पादनावर परिणाम झाला आहे. यामुळे काही प्रमाणात सड होऊन बीटची फळे खराब झाली.’

Back to top button