

मांडवगण फराटा, पुढारी वृत्तसेवा: मांडवगण फराटा – तांदळी या रस्त्याची तुकाई मंदिरनजीक पडलेल्या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरून प्रवास करताना प्रवाशांची मोठी दमछाक होत आहे. माऊली मंदिर ते एका खासगी दवाखान्यापर्यंत या रस्त्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. त्यापुढील अंदाजे दोनशे मीटर रस्त्याचे काम रखडलेले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून या रस्त्याला ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. खड्ड्यात पावसाचे पाणी साचत असल्याने या खड्ड्यातून वाट शोधत नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. चारचाकी वाहन जात असताना वाहनचालकांकडून खड्ड्यांमध्ये साचलेले पाणी पायी चालणार्या व्यक्तीच्या अंगावर उडले जात आहे.
त्यामुळे वाहनचालकाची व पायी चालणार्या व्यक्तींची भांडणे होत आहेत. रस्त्यावरून शालेय विद्यार्थ्यांची देखील मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्याचबरोबर ऊसवाहतूक देखील या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात होत आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले असल्यामुळे उसाचा टेलर पलटी होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या रस्त्याला पडलेले खड्डे वाचविताना अपघात होण्याची शक्यता असून लवकरात लवकर या ठिकाणावरील रस्ता दुरुस्त करून घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.