वेल्ह्यात चंदनचोरांचा धुमाकूळ; पंचायत समिती विश्रामगृहाच्या आवारातून झाडांची चोरी | पुढारी

वेल्ह्यात चंदनचोरांचा धुमाकूळ; पंचायत समिती विश्रामगृहाच्या आवारातून झाडांची चोरी

वेल्हे; पुढारी वृत्तसेवा: वेल्हे तालुका पंचायत समितीच्या विश्रामगृहाच्या आवारातील चंदनाची झाडे चोरट्यांनी कापून नेली आहेत. दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून चंदन चोरट्यांचा वेल्हेसह राजगड, तोरणा भागात धुमाकूळ सुरू आहे. या पूर्वी तालुका वन विभागाच्या कार्यालयाच्या आवारातूनही चंदनाची झाडे चोरट्यांनी लंपास केली. सरकारी तसेच खासगी मालकीच्या जागेतील चंदनाची झाडे चोरटे लंपास करीत आहेत. त्यामुळे वनविभाग हतबल झाला आहे.

वनपरिमंडल अधिकारी एस. एन. सकपाळ म्हणाले, ‘वेल्हे पंचायत समितीच्या विश्रामगृहाच्या आवारातील चंदनाच्या झाडांची चोरी करणार्‍या चोरट्यांचाा शोध सुरू आहे. वनविभागाच्या कर्मचार्‍यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.’ माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद देशमाने म्हणाले, ‘वेल्हे तोरणा परिसरात मौल्यवान चंदानाची झाडे मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, सध्या परिसरात चंदनाच्या चोरीचे प्रकार वाढले आहेत. हे रोखण्यासाठी वन विभागाने पोलिस व स्थानिक पातळीवरील वन व्यवस्थापन समीतीच्या माध्यमातून उपाययोजना करणे गरजेचे आहे.’

Back to top button