

कार्ला : पवनानगर कोथुर्णे येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण व हत्या प्रकरणातील नराधाम आरोपीला भरचौकात फाशी द्यावी, अशी मागणी आमदार उमा खापरे यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्र देऊन सदर केस फास्टट्रॅक कोर्टात चालवावी व आरोपीला फाशीचीच शिक्षा व्हावी याकरिता प्रयत्न करावेत, अशी मागणी करणार असल्याचे सांगितले.
कोथुर्णे गावातील सात वर्षी मुलीचे दोन दिवसांपूर्वी अपहरण झाले होते. बुधवारी तिचा मृतदेह जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे आढळून आला होता. याप्रकरणी कामशेत पोलिसांनी आरोपीला 24 तासांत अटक केली असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. मात्र, या घटनेची संतप्त प्रतिक्रिया मावळात उमटली असून आरोपीला फाशी द्यावी, या मागणीसाठी पवनानगर चौकात निषेध आंदोलन करण्यात आले.
आंदोलनासाठी हजारोंच्या संख्येने महिला युवक रस्त्यावर उतरले होते. या वेळी आंदोलनकर्त्यांनी काळे झेंडे व काळी फित लाऊन कॅन्डल मोर्चा काढला. या नराधमाला फाशी झालीच पाहिजे, अशी जोरदार घोषणाबाजी केली. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना काल मावळ तालुक्यात घडली. या वेळी माजी मंत्री बाळा भेगडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, ज्ञानेश्वर दळवी, किशोर भेगडे, नितीन घोटकुले आदींनी आरोपीला लवकरात लवकर शिक्षा करण्याची मागणी केली.
आरोपीवर कारवाई करा
वडगाव मावळ : मावळ तालुक्यात एका चिमुरडीच्या खूनप्रकरणी अटक असलेल्या आरोपीवर कठोर कारवाई कारवाई करावी, अशी मागणी सह्याद्री सम्राट स्वाभिमानी सामाजिक संघटनेच्या जिल्हाध्यक्षा शीतल थोरवे यांनी केली आहे. याबाबत जिल्हाध्यक्षा थोरवे यांच्यासह अनिल धर्माधिकारी, निलिमा गुंजाळ, सुजाता पाटील यांनी तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे, की आरोपीने काळिमा फसण्यासारखे कृत्य केले आहे. त्यास पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी. तसेच, वेळप्रसंगी सुधारित शक्ती कायद्याचा आधार घ्यावा. दरम्यान, संघटनेच्यावतीने या दुर्दैवी घटनेचा निषेध करण्यात आला आहे.
तळेगाव दाभाडे : आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी
कोथुर्णे गावामधील अल्पवयीन मुलीची हत्या प्रकरणातील आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांनी तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्याकडे केली आहे.
या संदर्भातील निवेदन त्यानीं तहसीलदार बर्गे यांना दिले आहे. या वेळी नगरसेवक समीर खांडगे, निखिल भगत, सुनील कारंडे, सुनील मोरे, कल्पेश भगत यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
तीन ऑगस्ट रोजी कोथुर्णे गावातील मुलीवर अत्याचार करण्यात आला होता. याचा जनसेवा विकास समितीकडून निषेध करण्यात आला. तसेच, नराधमांना लवकरात लवकर फाशी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
टाकवे येथे शुकशुकाट
मावळ तालुक्यातील कोथुर्णे गावातील सात वर्षीय मुलीचे अपहरण करून हत्या केल्याच्या निषेधार्थ आंदर मावळातील टाकवे बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. मावळ तालुक्यातील कोथुर्णे गावातील मुलीचे अपहरण होऊन हत्या आली होती. अशी दुर्देवी घटना तालुक्यात पहिल्यांदा घडली असल्यामुळे मावळ तालुक्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. टाकवे बुद्रुक बाजारपेट बंद करून शालेय विद्यार्थिनी रॅली काढत निषेध केला. या वेळी खंडोबा चौकात चिमुकलीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कामशेतमध्ये बंद
कोथुर्णे घटनेच्या निषेधार्थ कामशेत व्यापारी असोसिएशन व ग्रामपंचायत यांच्यावतीने बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. व्यापार्यांनीही उत्स्फूर्त बंदमध्ये सहभाग घेतला होता. कामशेत पोलिस ठाणे ते शिवाजी चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यामध्ये कामशेतमधील सर्व पक्ष, सामाजिक संघटना व महिला मोठ्या संख्येने सहभागी होते. यानंतर मोर्चाचे रूपांतर शिवाजी चौकात जाहीर सभेत झाले. सचिन शेडगे, गणेश भोकरे, तानाजी दाभाडे, डॉ. विकेश मुथा, प्रकाश गायकवाड व सरपंच रूपेश गायकवाड आदींची या वेळी भाषणे झाली. तसेच, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.
इंदोरीत कँडल मार्च
मावळ तालुक्यातील कोथुर्णे येथील 7 वर्षीय चिमुरडीचे अपहरण करून निर्घृण खून प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी इंदोरीत कँडल मार्च काढण्यात आला. इंदोरी ग्रामपंचायत आणि इंदोरी ग्रामस्थांच्यावतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. यामध्ये नागरिक, महिला व विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. या वेळी सहायक पोलिस निरीक्षक मनोजकुमार पांडे यांना ग्रामस्थांनी निवेदन दिले.