करंदीत आढळला मृतावस्थेतील बिबट्या | पुढारी

करंदीत आढळला मृतावस्थेतील बिबट्या

शिक्रापूर; पुढारी वृत्तसेवा: करंदी (ता. शिरूर) येथील गणपती माळ येथे एका शेतकर्‍याच्या शेतात मृतावस्थेतील बिबट्या आढळला. शिरूर वनविभाग व वन्य पशुपक्षी संरक्षण सामाजिक संस्थेच्या प्राणिमित्रांनी बिबट्याचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. करंदी येथील गणपती माळ येथे नलिनी वर्पे यांच्या शेतात काही मेंढपाळ मेंढ्या चरत असताना त्यांना शेताच्या बांधावर एक बिबट्या मृतावस्थेत दिसला. याबाबतची माहिती शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांना मिळताच वनपरिमंडळ अधिकारी प्रवीण क्षीरसागर, वनरक्षक बबन दहातोंडे, प्रमोद पाटील, अभिजित सातपुते, वन्य पशुपक्षी संरक्षण संस्थेचे सचिव शेरखान शेख, अमोल कुसाळकर यांनी सदर ठिकाणी धाव घेतली.

पोलिस पाटील वंदना साबळे, डॉ. नितीन सोनवणे आदी या वेळी उपस्थित होते. सदर ठिकाणी अंदाजे तीन वर्षे वयाची बिबट मादी मृतावस्थेत असल्याचे दिसून आले. वन विभागाचे अधिकारी व प्राणिमित्रांनी पंचनामा करत मृत बिबट्या शवविच्छेदनासाठी शिरूर येथील वनविभाग कार्यालयात पाठवून दिला. बिबट्याच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून शवविच्छेदनानंतर नेमके कारण समजू शकेल, असे वनपरिमंडळ अधिकारी प्रवीण क्षीरसागर यांनी सांगितले.

Back to top button