मांजाने चिमुकल्याची हनुवटी कापली; इंदापुरातील टेंभुर्णी नाका परिसरातील घटना | पुढारी

मांजाने चिमुकल्याची हनुवटी कापली; इंदापुरातील टेंभुर्णी नाका परिसरातील घटना

इंदापूर; पुढारी वृत्तसेवा: इंदापूर शहरातील टेंभुर्णी नाका परिसरात पतंगाच्या मांजाने हनुवटीचा भाग मोठ्या प्रमाणात कापला गेल्याने पावणेतीन वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. इंदापूर शहरातील खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. विराट उत्तम शिंदे (रा. स्वामी चिंचोली, भिगवण, ता. इंदापूर) असे या जखमी मुलाचे नाव आहे. बुधवारी (दि. 3) सायंकाळी ही घटना घडली.

मुलाच्या हनुवटीचा भाग एवढ्या मोठ्या प्रमाणात कापला गेला असून बाहेरील बाजूने जवळपास अठरा टाके पडले आहेत. जर पतंगाचा मांजा हा एक इंच खालील भागात कापला गेला असता तर थेट गळा कापला गेला असता. अतिशय गंभीर स्थितीत डॉ. लहू कदम यांनी धैर्य दाखवून ही शस्त्रक्रिया केल्याने मुलाचा जीव वाचला आहे.

विराट आपल्या आई आणि मामासह दुचाकीवर आजोळी रांझणी येथे निघाला असताना इंदापूर शहरातील जुना पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर टेंभुर्णी नाका परिसरात ही घटना घडली. चायनीज मांजा विराटच्या हनुवटीला आणि डाव्या गालावर कापल्याने क्षणातच विराट रक्तबंबाळ झाला. गेल्या अनेक वर्षापासून अशा पध्दतीचा मांजा वापरू नये, असे फतवे प्रशासन काढत आहे, मात्र कोणतीही ठोस कारवाई दिसत नाही. केवळ व्यावसायिकांना नोटीस देणे आणि पथकांची नेमणूक करणे यापलीकडे काही होत नाही.

इंदापूरच्या शेजारच्या बारामती तालुक्यात मांजा जप्त करून कारवाई केली जाते, मात्र इंदापुरात काही सापडत नाही हे विशेष होय. विराटसारखे शेकडो लोक राज्यात जखमी होतात, त्याही पलीकडे पशु-पक्षी यामुळे जखमी होतात, मृत्यू पावतात. बरेच मित्र यासाठी जनजागृती करीत असतात. यावर धडक कारवाई होणे गरजेचे आहे. शोधमोहीम राबवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

जेव्हा विराटला मांजा कापला तेव्हा तो रक्तबंबाळ झाला. उपस्थित नागरिक तत्काळ मदतीला धावले. त्याला माझ्या रुग्णालयात उपचारासांठी आणले त्यावेळी परिस्थिती गंभीर असताना मी धैर्य दाखवत ही शस्त्रक्रिया पार पाडली. काळ कठीण होता मात्र त्यावर मात करू शकलो. आजपर्यंतच्या वैद्यकीय सेवेत अशी घटना पाहिली नव्हती.
                                                                            डॉ. लहू कदम, बालरोग तज्ज्ञ.

Back to top button