

संतोष शिंदे :
पिंपरी : शहरातून दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेल्या तरुणाला दहशतवाद विरोधी पथकाने नुकतेच अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर 'दैनिक पुढारी'ने दहशतवादी हल्ल्यांचा सामना करणार कसा, या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर एटीबी (दहशतवाद विरोधी शाखा) सुरू करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या. दरम्यान, गुरुवारी (दि. 4) एटीबी स्थापन करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर 15 ऑगस्ट 2018 रोजी पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय कार्यान्वित करण्यात आले. मात्र, आयुक्तालय सुरू करतेवेळी काही महत्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष झाले. कोणतीही पूर्व तयारी न करता पुणे शहर पोलिसांच्या अखत्यारीत असलेली 9, पुणे ग्रामीण हद्दीतीतील 5 आणि 1 नवीन पोलिस ठाणे अशी 15 पोलिस ठाणी घेऊन पिंपरी- चिंचवडचा स्वतंत्र कारभार सुरू करण्यात आला. यामध्ये शहराच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाची असलेली पथके सुरू करण्यात आली नाहीत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिस दहशतवादी हल्ल्याचा सामना करणार कसा, असा प्रश्न उपस्थित करीत 'दैनिक पुढारी'ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते.
या वृत्ताची गंभीर दखल घेत पोलिस आयुक्तालय कार्यालयात स्वतंत्र एटीबी (दहशतवाद विरोधी शाखा) स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. यापूर्वी दहशतवाद विरोधी पथकांमध्ये काम केलेल्या अनुभवी पोलिसांची चाचपणी करण्यात आली. दरम्यान, सर्व सोपस्कार पार पाडून गुरुवारी 'एटीबी' या स्वतंत्र पथकाची स्थापना करण्यात आली. यामध्ये एक अधिकारी आणि पाच कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. आगामी काळात एटीबीचे संख्याबळ वाढवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
राष्ट्रद्रोही घटकांवर ठेवणार 'वॉच'
शहराच्या कोणत्याही भागात सक्रिय असलेल्या राष्ट्रद्रोही घटकांबद्दल माहिती गोळा करणे. तसेच, मिळालेल्या माहितीचा सखोल अभ्यास करण्याचे काम 'एटीबी' करणार आहे. दहशतवाद प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याची जबाबदारी 'एटीबी'वर राहणार आहे. राज्यातील अन्य दहशतवाद विरोधी विभागांशी समन्वय साधून 'एटीबी' काम करणार आहे. विशेषतः टेरर फंडिंगवर 'एटीबी' वॉच ठेऊन राहणार आहे.
असे असेल पथक सहायक पोलिस
निरीक्षक विवेक राऊत
सहायक पोलिस उपनिरीक्षक शामवीर गायकवाड
सहायक पोलिस उपनिरीक्षक शिरीष देसाई
पोलिस अंमलदार बसवराज धमगुंडे
पोलिस अंमलदार अरुण कुटे
पोलिस अंमलदार सुयोग लांडे