पुणे : बाप्पाचे बुकिंग ऑनलाईनही! थेट विक्रीबरोबर सोशल मीडियाचा आधार | पुढारी

पुणे : बाप्पाचे बुकिंग ऑनलाईनही! थेट विक्रीबरोबर सोशल मीडियाचा आधार

सुवर्णा चव्हाण

पुणे : गणेशमूर्तींच्या विक्रीसाठी व्यावसायिकांकडून थेट विक्रीबरोबरच आता सोशल मीडियाचाही आधार घेतला जात आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम असो वा यूट्यूबद्वारे गणेशमूर्तींच्या विक्रीसाठी प्रसिद्धी केली जात असून, काहींना त्याद्वारे गणेशमूर्तींचे बुकिंग मिळत असून, व्यावसायिकांनी आता डिजिटल माध्यमाचा आधार घेतला आहे. ऑफलाइन-ऑनलाइन अशी गणेशमूर्तींची विक्री होत आहे.

गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे शहरातील विविध भागांतील स्टॉल्सवर विलोभनीय गणेशमूर्ती पाहायला मिळत आहेत. कसबा पेठ, सहकारनगर, शनिवार पेठ, शास्त्री रस्ता, कोंढवा, वानवडी अशा विविध भागांमध्ये गणेशमूर्तीचे स्टॉल्स पाहायला मिळत आहेत. गणेशमूर्तींच्या बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळत असून, काही व्यावसायिक, तर सोशल मीडियाद्वारे प्रसिद्धी करीत आहेत आणि बुकिंग करीत आहेत.

फेसबुक, इन्स्टाग्रामवर त्यासाठी अधिकृत पेज उघडण्यात आले असून, त्याद्वारे गणेशमूर्तींचे अ‍ॅडव्हॉन्स बुकिंग करण्यासह प्रसिद्धी करण्यासाठी गणेशमूर्तींचे छायाचित्र, खास संदेश, व्हिडिओ पोस्ट केले जात आहेत, त्याद्वारेही व्यावसायिकांना अ‍ॅडव्हॉन्स बुकिंग प्राप्त होत आहे. डिजिटल माध्यमातून राज्यभरातील गणेशभक्त गणेशमूर्तींची बुकिंग करीत आहेत.

व्यावसायिक करण पांडे म्हणाले, ‘नुकतीच आम्ही स्टॉल्सला सुरुवात केली आणि आतापर्यंत 25 मूर्तींचे बुकिंग झाले आहे. शाडूच्या मूर्तींची विक्री आम्ही करीत आहेत. पेणवरून 300 मूर्ती आम्ही मागवल्या आहेत. शारदा गजानन असो वा गणरायाची विविध रूपे…पारंपरिक गणेशमूर्तींना मागणी आहे. लोक अ‍ॅडव्हान्स बुकिंगही करीत आहेत.’

गणेशमूर्तींच्या किमती वाढल्या…
यंदा इंधनाची किंमत, वाहतुकीचा खर्च आणि इतर सामग्रीची किंमत वाढल्यामुळे गणेशमूर्तींच्या किमती 25 ते 30 टक्क्यांनी वाढल्या आहेत. 100 रुपयांची गणेशमूर्ती 130 रुपयांना मिळत आहे. गणेशमूर्तींंच्या किमती वाढल्या असल्या, तरी गणेशमूर्तींच्या बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

शाडूच्या मूर्तीला प्रतिसाद
सध्या स्टॉल्सवर शाडूच्या मूर्तींसह पीओपीच्या मूर्तींचीही विक्री होत असल्याचे दिसले. शाडूच्या मूर्तींना यंदा चांगला प्रतिसाद आहे. लोक आर्वजून शाडूची मूर्ती विकत घेत असून, बाल गणेशापासून ते विविध आभूषणांनी सजलेल्या गणेशमूर्तीची सर्वाधिक विक्री होत आहे. शाडूच्या मूर्तीत यंदा विविध प्रकारच्या मूर्ती उपलब्ध असून, त्या लक्ष वेधून घेत आहेत.

Back to top button