फुरसुंगी रेल्वे उड्डाणपुलाखाली कचर्‍याचे साम्राज्य | पुढारी

फुरसुंगी रेल्वे उड्डाणपुलाखाली कचर्‍याचे साम्राज्य

फुरसुंगी; पुढारी वृत्तसेवा: हडपसर-सासवड मार्गावरील फुरसुंगी रेल्वे उड्डाणपुलाखाली कचरा टाकण्यात येत असून, तो वेळच्या वेळी उचलला जात नसल्यामुळे याठिकाणी कचर्‍याचे साम्राज्य तयार झाले आहे. कचरा उचलला जात नसल्यामुळे या ठिकाणी दुर्गंधीचे व अनारोग्याचे वातावरण तयार झाले आहे. आजूबाजूचे रहिवासी, व्यावसायिक व येणार्‍या-जाणार्‍यांना या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. शिवाय याठिकाणी भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याने रहिवाश्यांना त्यांचा उपद्रव होत आहे.

आजूबाजूचे हॉटेल व्यावसायिक व इतर रात्रीच्या वेळेस या ठिकाणी गुपचूप कचरा आणून टाकत आहे. त्यामुळे प्रामुख्याने हॉटेल व किचन वेस्टचे प्रमाण मोठे आहे. तसेच टाकावू भाजीपाला, प्लॅस्टिक कचरा यामध्ये असतो. कचरा वेळच्या वेळी उचलला जात नसल्यामुळे याठिकाणी कचर्‍याचे ढीग तयार होत आहेत. कचरा पेटवून दिला जात असल्यामुळे हवेचे प्रदूषण होत आहे.

कचरा डेपोपासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असूनही या ठिकाणी कचरा साठून राहत आहे. उरुळी देवाची गावात अनेक ठिकाणी अशाप्रकारे कचर्‍याचे ढीग साठले आहेत. त्यामुळे कोरोनामुळे पिचलेले रहिवासी डेंग्यू, चिकुनगुनिया व आरोग्याच्या समस्यांचा सामना करीत आहेत. ग्रामपंचायत असताना वेळच्या वेळी कचरागाडी येत होती. मात्र, पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे उरुळी-फुरसुंगीकरांवर ही वेळ आली आहे. पालिकेने येथील कचरा वेळच्या वेळी उचलावा, अशी मागणी येथील रहिवाश्यांकडून करण्यात आली आहे.

Back to top button