किरकटवाडी : वांजळे उड्डाणपुलाखाली सिग्नल बंद असल्याने वाहतूक कोंडी | पुढारी

किरकटवाडी : वांजळे उड्डाणपुलाखाली सिग्नल बंद असल्याने वाहतूक कोंडी

किरकटवाडी; पुढारी वृत्तसेवा: सिंहगड रस्त्यावरील धायरी फाटा येथील वांजळे उड्डाणपुलाखाली सिग्नल यंत्रणा बंद असल्याने वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. या चौकात दंडात्मक कारवाई बंद केल्यापासून वाहतूक पोलीसही नसतात, त्यामुळे चौकात बेशिस्त वाहनचालकांमूळे वाहतूक कोंडी होत असून, वर्क हवरमध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे चाकरमान्यांचा संताप वाढला आहे. धायरी फाटा चौकात धायरीगाव, नऱ्हेगाव, नांदेड, खडकवासला आणि डीएसके विश्व या परिसरात जाणार्‍या आणि येणार्‍या वाहनांची संख्या मोठी आहे.

चौकात मुंबई बायपास रस्त्याने वारजेकडून कॅनॉल रस्त्याने येऊन पुलाखालून वळण घेऊन नायरा आणि खडकवासल्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असते. चौकातील वाढत्या वाहतूकवर नियंत्रण मिळविण्यासाठी सिग्नल बसविण्यात आले आहेत; परंतु मागील कित्येक महिन्यांपासून चौकातील सिग्नल यंत्रणाही बंद असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.

पोलिसांनी दंडात्मक कारवाई करण्याचे बंद केल्यापासून या चौकात वाहतूक पोलीसही नसतात. त्यामुळे बेशिस्त वाहनचालकांचे फावते. त्यामूळे या चौकात वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. केवळ दंडात्मक कारवाई करण्यासाठीच पोलिसांची फौज टोळक्याने उभी असते का, असा प्रश्नही अनेक वाहनचालकांनी उपस्थित केला आहे.

Back to top button