पार्किंगमध्ये व्यवसाय अन् वाहने रस्त्यावर; कल्याणीनगर कोंडीत अडकले | पुढारी

पार्किंगमध्ये व्यवसाय अन् वाहने रस्त्यावर; कल्याणीनगर कोंडीत अडकले

वडगाव शेरी; पुढारी वृत्तसेवा: कल्याणीनगरमध्ये मेट्रोच्या कामामुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्यातच अनेक व्यावसायिकांनी पार्किंगच्या जागेवर व्यवसाय सुरू केला आहे. व्यावसायिकांचे ग्राहक रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने पार्किंग करतात. त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्यावर वाहन पार्किंग केल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याबाबत नागरिक आणि सामाजिक संस्थांनी बांधकाम विभाग आणि वाहतूक पोलिस विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा कोंडमारा सहन करावा लागत आहे. कल्याणीनगरमध्ये अनेक आयटी कंपन्या आहेत.

या कंपनीतील कर्मचारी जेवण्यासाठी, नाष्टा करण्यासाठी हॉटेल आणि इतर व्यावसायिकांकडे येतात. आयटीतील ग्राहकांची संख्या जास्त असल्याने, या भागामध्ये छोटे-मोठे हॉटेल आणि इतर व्यावसायिकांची संख्या वाढली आहे. या व्यावसायिकांनी जास्त फायदयासाठी पार्किंगमध्ये पोट भाडेकरू ठेवले आहेत. या पार्किंगमध्ये बांधकाम करून दुकाने, मोबाईल शॉपी, चहावाले, अशा विविध व्यावसायिकांना भाड्याने दिले आहेत. तसेच काही जणांनी पार्किंगमध्ये बांधकाम करून व्यवसायाची जागा वाढवली आहे.

या व्यावसायिकांकडे येणार्‍या ग्राहकांना रस्त्यावर वाहने पार्क करावे लागतात. वाहने पार्किंग करण्यासाठी जागा मिळत नसल्याने, आता रस्त्याच्या दोन्ही बाजूला पार्किंग सुरू झाली आहे. या पार्किंगमुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. यामुळे कल्याणीनगर येथील मारिप्लेक्स मॉल ते सिल्वर ओक, फोर्टलिजा सोसायटी, लँडमार्क सोसायटी, जॉगर्स पार्क या रस्त्यांवर पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होत आहे.

इमारतीचे बांधकाम केल्यानंतर प्रत्येक व्यवसायिकाने दुकानासाठी पार्किंगची व्यवस्था केली असते. इमारतीच्या बांधकाम नकाशामध्ये तसा आराखडा असतो. पालिकेच्या बांधकाम विभाग या सर्व बाबीची तपासणी केल्यानंतर संबधितांना बांधकाम पूर्णत्वाचा नकाशा देते. मात्र, पूर्णत्वाचा दाखला घेतल्यानंतर व्यावसायिक पार्किंगमध्ये धंदा सुरू करतात. पार्किंगच्या जागेवर व्यवसाय करणार्‍यावर महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना व अधिनियम अ‍ॅक्ट 1966 नुसार कारवाई केली जाते.

मात्र, तरी बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करते. पार्किंगची व्यवस्था नसल्याने व्यवसाय सुरू करता येत नाही. तरी, पार्किंगशिवाय कल्याणीनगर येथे अनेक व्यवसाय सुरू आहेत. या प्रकारच्या नागरिकांनी अनेक तक्रारी बांधकाम विभागाकडे केल्या आहेत. मात्र, बांधकाम विभाग या तक्रारीवर कागदी घोडे नाचवते. या तक्रारीला केराची टोपली दाखवत असल्याची माहिती कल्याणीनगरमधील रहिवाशांनी दिली.

 

Back to top button