कोंडी, कचर्‍याच्या विळख्यात सिंहगड; राज्यातील सर्वांत अधिक गर्दीचे पर्यटन केंद्र | पुढारी

कोंडी, कचर्‍याच्या विळख्यात सिंहगड; राज्यातील सर्वांत अधिक गर्दीचे पर्यटन केंद्र

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा: राज्यात सर्वांत अधिक गर्दीचे पर्यटन केंद्र असलेल्या सिंहगड किल्ल्यावर दिवसेंदिवस वाहतूक कोंडी व कचर्‍याची समस्या अधिक गंभीर होत आहे. घाट रस्त्यावर होणार्‍या प्रचंड वाहतूक कोंडीचा फटका पर्यटकांसह स्थानिकांना बसत आहे. महिनाभरात सिंहगडावर अडीच लाखांवर पर्यटकांनी हजेरी लावली आहे. गडावर वाहनाने जाणार्‍या पर्यटकांकडून वन खाते दर आठवड्याला तीन ते चार लाख रुपयांचा टोल वसूल करीत आहे. सुट्टीच्या दिवशी गडावर कांदाभजी, झुणका भाकर खाद्य पदार्थ विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.

असे असले, तरी गडाच्या स्वच्छता व वाहतूक कोंडीची समस्या अलीकडच्या काळात गंभीर होत चालली आहे. त्यामुळे गडाच्या स्वच्छतेसाठी स्थानिक विक्रेते व खासगी वाहनचालक वन खात्याच्या मदतीला पुढे सरसावले असून, घाट रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रस्त्याच्या गटारांची दुरुस्ती, अवसरवाडी फाट्यावर गेट, साईड पट्ट्यांची दुरुस्ती करण्यासाठी वनविभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. प्लॅस्टिक बंदी असूनही शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी गडावर मोठ्या प्रमाणात कचरा पडत आहे.घाट रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सुरक्षा रक्षकांना धावपळ करावी लागली.

गडावरील वाहनतळ, तसेच घाट रस्त्यावर वाहतुकीचे नियोजन करूनही वाहनतळाच्या रस्त्यावर, अवसरवाडी फाट्यावर तसेच ठिकठिकाणी घाट रस्त्यावर वाहने उभी करणार्‍या पर्यटकांमुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत आहे. धोकादायक बुरुज, दरडी, कड्यावर जाणार्‍या पर्यटकांना आवर घालण्यासाठी फलक लावण्यात आले आहेत. तरीही न जुमानता हिंस्र प्राण्यांचा वावर असलेल्या दुर्गम जंगलात, डोंगरात पर्यटक मौज मजा करीत आहेत. वाहतूक कोंडी, तसेच गडावर दिवसभर थांबणार्‍या पर्यटकांमुळे सुट्टीच्या दिवशी निम्म्याहून अधिक पर्यटकांना माघारी जावे लागत आहे.

सिंहगड घाट रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी अवसरवाडी टोल नाक्यावर गेट बसवण्यात येणार आहे. तसेच गोळेवाडी व अवसरवाडी या दोन्ही मार्गांच्या घाट रस्त्यावर, तसेच डोंगर, जंगलात वाहने उभी करण्यास मनाई करण्यात येणार आहे. गडावरील कचरा नियमित उचलण्याची कार्यवाही केली जात आहे. आज झालेल्या बैठकीत गडाच्या स्वच्छतेसाठी स्थानिक विक्रेते व खासगी जीपचालकांनी सिंहगडाच्या स्वच्छतेचा निर्धार केला.वनविभागाचे वनरक्षक बाबासाहेब जिवडे, माजी पंचायत समिती सदस्य दत्तात्रय जोरकर , माजी सरपंच विश्वनाथ मुजुमले, घेरा सिंहगडचे उपसरपंच गोफणे, माऊली कोडीतकर आदी सहभागी झाले होते.

                                  – प्रदीप सकपाळ, वनविभाग वनपरीक्षेत्र अधिकारी

गडावर पडणार्‍या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी स्थानिक विक्रेते सहभागी होणार आहेत. गडावर खुर्ची , चटई बंदी केल्यास जादा वेळ पर्यटक थांबणार नाहीत.त्यामुळे जादा पर्यटकांना गडावर जाता येईल. घाट रस्त्याच्या अरूंद गटारात वाहने कोसळण्याचे प्रकार घडत आहे.अशा ठिकाणाची दुरूस्ती करण्याचे बांधकाम विभागाला कळविण्यात आले आहे.

                                                                                    – जिवडे, वनरक्षक

Back to top button