पिंपरी : फूल विक्रेत्यांचे वाहनतळावर अतिक्रमण | पुढारी

पिंपरी : फूल विक्रेत्यांचे वाहनतळावर अतिक्रमण

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  पिंपरीतील साई चौकातील फुलविक्रेत्यांनी वाहनतळावर अतिक्रमण केल्यामुळे वाहन चालकांनी वाहने कुठे? लावायची, असा प्रश्न पडला आहे. फूल विक्रेत्यांच्या अतिक्रमणावर कारवाई होऊनही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. शहरामध्ये आधीच वाहनतळाची मोठी समस्या आहे. त्यामुळे बेशिस्तपणे वाहने पार्क केल्यास वाहनचालकांनाच दोष दिला जातो. मात्र, हक्काच्या वाहनतळावर देखील विक्रेत्यांचे अतिक्रमण होत असेल तर वाहनचालकांना नाईलाजाने जिथे जागा मिळेल तेथे वाहने पार्क करावी लागतात. साई चौक हा नेहमी वर्दळीचा चौक आहे.

याठिकाणी दिवसभरात हजारो गाडया ये-जा करत असतात. सायंकाळी आणि सकाळी नागरिक खरेदीसाठी येत असतात. याठिकाणी असणार्‍या फूल विक्रेत्यांनी दुकानासमोरील फुटपाथवर अतिक्रमण केले आहे. आता हळूहळू रस्त्यावरील वाहनतळावर देखील अतिक्रमण केले आहे. मात्र, गाडी पार्क करायच्या वाहनतळावर अतिक्रमण केल्यामुळे रस्ते अरुंद होत असून वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. अशा गर्दीच्या ठिकाणावरून गाड्या चालविताना नागरिकांना रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. अतिक्रमण हे अपघाताला आमंत्रण ठरू शकते.

साई चौकातील फूल विक्रेत्यांनी फूटपाथ आणि वाहनतळावर अतिक्रमण केले आहे. तरीही वाहतूक पोलीसांकडून ठोस कारवाई केली जात नाही. शहरात पार्किंगची इतकी मोठी समस्या आहे. त्यामुळे फुले विक्रेत्यांनी अभय कोणाचे असा प्रश्न पडत आहे.
-नीलेश मोरे, वाहनचालक

 

Back to top button