पिंपरी : राजकीय वाढदिवसांमुळे, बुकेंना वाढली मागणी | पुढारी

पिंपरी : राजकीय वाढदिवसांमुळे, बुकेंना वाढली मागणी

राहुल हातोले : 
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या महिनाभरात आलेल्या वाढदिवसांमुळे शहरातील बुके विक्रेत्यांची चांदीच झाल्याचे चित्र दिसून आले आहे. यामध्ये बुक्यांचा अधिक खप हा राजकीय पुढार्‍यांच्या वाढदिवसाला झाला आहे, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली आहे.
शहरात जून आणि जुलै महिन्यात सर्वाधिक वाढदिवस, अ‍ॅनिव्हर्सरी आणि निवृत्ती सोहळा आदी कार्यक्रमांची संख्या आधिक प्रमाणात होती. या सोहळ्यांसाठी बर्‍याच मंडळीनी आपल्या नातेवाईकांना शुभेच्छा देण्यासाठी बुकेंची खरेदी केली होती.

बुके विक्रेत्यांकडे असलेल्या राऊंड गुलाब बुके, सिंगल बास्केट व डबल बास्केट आदी बुकेंच्या प्रकाराला अधिक मागणी होती.
भोसरी येथील एका पुढार्‍याच्या जन्मदिना निमित्त पक्ष कार्यालयाच्या बाजुला असलेल्या एका बुके विक्रेत्याचा दिवसाला 200 ते 250 बुकेंचा खप झाल्याने, बुके बनविताना दमछाक झाल्याची माहिती विक्रेत्याने दिली आहे.

बुक्यांमध्ये जोडणार्‍या वनस्पती
जर्बेरा, गुलाब (लाल, पिवळा, पांढरा), स्पिंगर, सायकस, कार्नेशिअन, गुलछडी काडी, गीलाडो, डीजी फूल, जीप्सी, देशीना पत्ता, व्हायसेस स्पंच, ऑरकेट आदी वनस्पतीं एकत्र करून बुके बनवतात.

गेल्या दोन महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बुकेंची विक्री झाली आहे. यामध्ये राजकीय पुढार्‍यांच्या वाढदिवसाला अधिक खप झाला आहे. राऊंड गुलाबाच्या बुकेला सर्वाधिक मागणी होती.
– सचिन आहेर, बुके विक्रेता, पिंपरी

बुक्यांचे प्रकार दर (रूपये)
राऊंड गुलाब बुके 200 – 250
डबल बास्केट बुके 250 – 1000
सिंगल बास्केट बुके 200- 250
चटई बुके 100 -150

Back to top button